पुणे- आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी ( clashes between BJP and NCP in PMC ) पाहायला मिळत आहे. गेली अनेक दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महापालिकेत सत्तेत असणाऱ्या भाजपवर आरोप करताना पाहायला मिळत आहे. पुणे महापालिकेतील भाजपच्या पाच वर्षांच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली ( NCP complaint against BJP in ACB ) आहे.
भाजपने इतक्या कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप
गेल्या पाच वर्षापैकी भाजपने गेल्या केवळ सहा महिन्यांत 11 हजार 50 कोटींचे प्रकल्प हाती घेण्यात ( 11 thousand crore projects in Pune ) आले आहेत. यात भाजपचा संपूर्ण कारभार संशयास्पद असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. भाजपकडून सहा हजार कोटींचा भ्रष्टाचार सहा महिन्यांतील प्रकल्पात झाल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून ( 6 thousand crore corruption in PMC ) करण्यात आला आहे.
हेही वाचा-Amravati Shivaji Maharaj Statue : राजापेठ उड्डाणपुलावरच उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा; मनपाकडून प्रस्ताव पारीत
राष्ट्रवादीचे भाजपवर हे आहेत आरोप
- पुणे मनपाच्या 24 x 7 समान पाणी पुरवठा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता तसेच यामध्ये ठेकेदारांच्या आर्थिक हिताच्या दृष्टीने अनेक ठिकाणी बदल करून सदर योजनेची किंमत अनियमतपणे वाढविण्यात आली.
- पुणे मनपाच्या माध्यमातून बाणेर व वारजे येथे पुणे मनपाच्या प्रचलित नियमाप्रमाणे प्रक्रिया न करता अनियमित पध्दतीने काही व्यक्ती व संस्था यांच्या आर्थिक हिताचा विचार करून बाणेर व वारजे येथे 1000 कोटी रुपयांचे कर्ज घेवून हॉस्पिटल उभे करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
- पुणे शहरातील पुणेकरांच्या हक्काच्या 356 अॅमिनीटी स्पेसेस या खासगी बांधकाम व्यवसायिकाच्या आर्थिक फायदयासाठी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये देखील मोठा भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता आहे.
- जायका प्रकल्पामध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या कामामध्ये मोठया प्रमाणात अनियमितता निवीदा प्रक्रियेमध्ये दिसून आलेली आहे.
- 16 फेब्रुवारी 2022 रोजी पुणे मनपा शिक्षण समिती बैठकीमध्ये खासगी बांधकाम व्यावसायिक व सत्ताधारी पदाधिकारी यांच्या हितासाठी नियमबाहय पद्धतीने आरक्षित असलेल्या प्राथमिक शाळांचा प्रस्ताव नियम डावलून मान्य करण्यात आला. या प्रस्तावामध्ये खासगी बांधकाम व्यावसायिकाचा पुरेपुर आर्थिक संबंध आहे, असे प्रथम दर्शनी दिसून येते. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची राष्ट्रवादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.
- 11 समाविष्ट गावांमध्ये ड्रेनेज लाईन टाकणे या 393 कोटीच्या निवीदेमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. या निविदेबाबत अनेक व्यक्ती व संस्था यांनी न्यायालयामध्येदेखील दाद मागितलेली आहे. तसेच तकारसुध्दा दाखल केलेली आहे. या निविदेप्रक्रियेत मोठया प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार व आर्थिक हितसंबंध असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे.
भाजपने फेटाळले आरोप-
दुसरीकडे सत्ताधारी भाजपने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. मागील पाच वर्षात भारतीय जनता पक्षाने शहराच्या विकासाला गती दिली आहे. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांना ते जमले नाही, म्हणून त्यांची अवस्था झाल्याचा टोला भाजपचे नेते हेमंत रासने यांनी लगावला आहे.