पुणे - २०१९ च्या निवडणुकीत मोदींच्या कामगिरीवर नव्हे तर, पुलवामाचा राजकीय फायदा घेत भाजप निवडून आले होते. आज जी परिस्थिती आहे त्यावर लोक भाजपवर नाराज आहे. २०२४ ला या देशात मोदी सरकार सत्तेत राहणार नाही, हे स्पष्ट आहे. या देशात भविष्यात परिवर्तन अटळ आहे. आणि परिवर्तन होणार आहे, असे मत राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( nawab malik criticize bjp ) यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - Vehicle thefts hike in Pune : पुणे शहरातून वर्षभरात तब्बल 1200 वाहनांची चोरी
मंत्री नवाब मलिक हे पुण्यातील औध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एका कार्यक्रमाला आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी विविध विषयांवर त्यांनी आपले मत व्यक्त केले.
आमच्यात कशी फूट पडेल, हे भाजपवाले बघत आहेत
भाजपविरोधी मोट बांधण्यासाठी, सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार पुढाकार घेत आहेत. काँग्रेसला सोबत घेऊन भाजप विरोधात पर्याय उभा करत आहोत, याची चिंता भाजपला लागली असून, आमच्यात कशी फूट पडेल, हे भाजप वाले बघत आहेत. मात्र, त्यांनी एनडीएकडे लक्ष द्यावे. एनडीएत कोणीही राहायला तयार नाही. नितीश कुमार कधीही सोडून जातील. आम्ही एकजुटीने सरकार चालवत आहोत. गोव्यात सरकार राहील की नाही, याची चिंता करा. पुलवामाच्या घटनेनंतर तो आरडीएक्स कुठून आला, आजपर्यंत त्याचा अहवाल त्यांनी दिला नाही. पुलवामानंतर जी परिस्थिती या देशात निर्माण झाली त्याचा फायदा घेऊन भाजप या देशात सत्तेत आले आहे. ७ वर्षे देशात सत्ता असताना आतंकवाद संपत नाही. चीनचे अतिक्रमण संपत नाही. २०१९ ला मोदी साहेबांच्या कामगिरीवर नव्हे तर, पुलवामाचा राजकीय फायदा घेत भाजप निवडून आले होते, अशी टीका नवाब मलिक यांनी भाजपवर केली.
देशात सर्व पक्षांची मोट बांधताना काँग्रेसला सोबत घेऊनच जाणार
देशात वेगवेगळे प्रश्न असताना युपीएच्या बैठकीत ज्यावर चर्चा व्हायला हवी होती ती झाली नाही, हे सत्य आहे. आम्ही या देशात सगळ्यांची मूठ बांधण्याचे काम करत आहोत. आणि ही मूठ काँग्रेस सकट बांधण्यात येणार आहे. सामूहिक नेतृत्व करून हा मोर्चा काम करेल. ज्यांना चिंता वाटत आहे की, काँग्रेस राहणार की ममता. शरद पवार हे एक चाणक्य आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. देशात सर्व पक्षांची मोट बांधताना काँग्रेसला सोबत घेऊनच जाणार आहोत. कोणी स्वप्नातही बघितले नव्हते की शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येतील, ते आज एकत्र आले आहेत. सगळ्यांची मूठ बांधण्याचे काम हे शरद पवार करतील. कोणालाही बाहेर न ठेवता सर्व एकत्र येतील, असे देखील मलिक म्हणाले.
गांधीनगर हे आर्थिक राजधानी होऊ शकत नाही
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. येथे सर्व कॉर्पोरेट कंपन्या आहेत. कोणीही कट कारस्थान करून महाराष्ट्राचे उद्योग पळवले नाही. पण, ७ वर्षांत मोदी सरकार आल्यानंतर आस्थापना या मुंबईत न होता गुजरातच्या गांधीनगरमध्ये कसे जाणार यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. आणि जे लोक आज बोट दाखवत आहे त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. महाराष्ट्र हा महाराष्ट्र आहे. कुणी कितीही स्वप्न पाहिली तरीस गांधीनगर हे आर्थिक राजधानी होऊ शकत नाही. मुंबई हीच आर्थिक राजधानी आहे आणि राहील. हे भाजप वाल्यांना कळले पाहिजे, असे मलिक म्हणाले.
खोटे बोलण्यात भाजप प्रसिद्ध
परमबीर सिंग प्रकरणात लाईव्ह डिटेक्टर त्यांच्याकडे आहे. त्यांनी दाखवावे. खोट बोला रेटून बोला, हा भाजपचा उद्योग आहे. इतर लोक खोट बोलतात हे हास्यास्पद आहे. फॅक्ट चेक नावाचे एक अॅप आहे. जे लोक बोलतील त्यात चेक करावे. खोटे बोलण्यात भाजप प्रसिद्ध आहे. त्यामुळे, त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होऊ शकते, असा टोला देखील नवाब मलिक यांनी लगावला.
हेही वाचा - Rains In Pune : पुण्याला आवकाळी पावसाचा फटका; 700 पेक्षा अधिक मेंढ्यांचा मृत्यू