पुणे - माळशेज घाटाजवळच्या करंजाळे येथील राष्ट्रीय महामार्ग खचल्याने मागील १० दिवसापासून अहमदनगर-कल्याण महामार्गावरील एसटी बसची वाहतूक बंद झाली आहे. मात्र, प्रशासनाने एकेरी वाहतूक सुरू ठेवल्याने खासगी वाहतूकदार प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट करत आहेत. खासगी प्रवासी वाहतूकदार तब्बल दुप्पट व तिपटीने भाडे घेऊन प्रवाशांची लुबाडणूक करत आहेत.
नगर-कल्याण महामार्गावरून प्रवास करणाऱ्या सुमारे १२५ बसगाड्या बंद झाल्या आहेत. त्यामुळे नगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद आणि सोलापूर आदी विविध जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झालेली आहे. शिवाय एसटी बसेस बंद असल्याने महामंडळाचे दिवसाला लाखो रुपयांचे नुकसान होत आहेत. याकडे संबंधित खाते व पोलीस यंत्रणांचे देखील दुर्लक्ष होत आहे. याप्रकारामुळे प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व संताप व्यक्त होत आहे.
श्रावण महिना असल्याने यात्रा आणि सणवाराचे दिवस सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. परंतु हा राष्ट्रीय महामार्ग बसच्या वाहतुकीसाठी बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झालेली आहे. लोकप्रतिनिधी व संबंधित खात्यातील अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने करावे पूर्ण करावे. तसेच पोलीस यंत्रणेने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.