पुणे- कोरोनाच्या काळात रक्ताच्या नात्यामधील व्यक्तीही कोरोना रुग्णावर अंतिमसंस्कार करण्यासाठी घाबरतात. अशा व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठीदेखील कोणी समोर येत नसल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत पुण्यातील मुस्लीम तरुणांची उम्मत ही संस्था मागील वर्षभरापासून कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे कार्य पार पाडत आहेत. विशेष म्हणजे रमजाननिमित्त उपवास सुरू असतनाही त्यांचे हे कार्य रोज सुरू आहे.
जावेद खान हे उम्मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तीन वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना झाली. तेव्हा ससून रुग्णालयातील आणि रस्त्यावर पडलेल्या बेघर, बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात होते. यासाठी पोलीस प्रशासन आणि ससून रुग्णालयाची परवानगी घेऊन हे मृतदेह ताब्यात घेतले जायचे. त्यानंतर या मृतदेहाची पाहणी करून त्या धर्मानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जायचे. परंतु मागील वर्षी कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर मे, जूनपासून मृत्यूचे प्रमाण वाढले होते. तेव्हा कोरोनाबधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कोणी पुढे येत नव्हते. अशा परिस्थितीत उम्मत संस्थेने महानगरपालिकेची परवानगी घेऊन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून संस्थेने आतापर्यंत हजाराहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.
रमजान महिन्यात उपवास असतानाही काम सुरू-
जावेद खान म्हणाले की, संस्थेचे 30 ते 40 सदस्य दररोज 16 ते 18 तास मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम करत आहेत. संस्थेतील सर्व सदस्य मुस्लिम आहेत. सध्या रमजान महिना सुरू असल्यामुळे बहुतांश सदस्यांचा रोजा असतो. सकाळी सेहरा (न्याहरी) केल्यानंतर हे सर्व घराबाहेर पडतात. सकाळी 10 नंतर रुग्णालय आणि मृतांच्या नातेवाइकांकडून फोन येण्यास सुरुवात होते. मग तिथून पुढे संस्थेच्या कामाला सुरुवात होते. रुग्णवाहिका बुक करणे, रुग्णालयात जाऊन मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवणे, रुग्णवाहिका स्मशानभूमीत पोहोचवणे, त्यानंतर मृतदेहावर धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचे काम हे संस्थेचे सदस्य करत आहेत. या संस्थेतील सदस्य हिंदू स्मशानभूमीत चिताही रचतात अन् शेवटचा भडाग्नी देऊन हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार ही पूर्ण करतात.
हेही वाचा-माणूसकी अजूनही जिवंत.. माजी सरपंच व सहकाऱ्यांनी १०९ कोरोनाबाधित मृतदेहांवर केले अंत्यसंस्कार
माणुसकीचा धर्म पाळणारे जावेद खान आणि त्यांचे सहकारी
जावेद खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आजवर हजारहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. कोरोनामुळे रक्ताचे आणि जवळचे नातेवाईकही मृतदेहाला स्पर्श करण्यासाठी घाबरत असतात. अशा परिस्थितीत जावेद खान आणि त्यांचे सहकारी कोणतीही भीती न बाळगता हिंदू धार्मिक विधीनुसार चिता रचून अंत्यसंस्कार करतात. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या हिंदू धर्मातील अनेकांवर त्यांनी संस्कार केले. आपला धर्म कोणता याचा विचार न करता माणुसकीचा धर्म पाळणारे जावेद खान आणि त्यांचे सहकारी हेसुद्धा कोरोना योद्धेपेक्षा कमी नाहीत.
हेही वाचा-'असे' केले जातात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार
नागुपुरातही माणुसकीचे दिसून आले उदाहरण-
नागुपरातील खरबी भागात राहणारे श्रीराम बेलखोडे नामक एका व्यक्तीचा (रविवारी) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 19 एप्रिलला मृत्यू झाला. त्यानंतर शेजाऱ्यांनी तर सोडाच सगे-सोयऱ्यांनी देखील भीतीपोटी आपल्या घराचे दार बंद करून घेतले होते. तब्बल पाच तास मृतदेह घरात पडून असल्याची माहिती समजताच सलमान रफिक नामक तरुणाने पुढाकार घेऊन श्रीराम बेलखोडे यांच्यावर हिंदू धर्माच्या पद्धतीने अंत्यसंस्कार केले. सलमान रफिक खान याने आपल्या इतर मित्रांच्या मदतीने अंतिम विधीसाठी साहित्य आणले, स्वतः खांदा दिला व हिंदू रितीनुसार मृतदेहावर दिघोरी स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले. त्यानंतरच सलमानने रोजा सोडला. सलमान हा शिवसैनिक असून युवासेनेचा पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे.