पुणे - शहरातील कोथरूड आणि हडपसर परिसरात दिवसाढवळ्या खुनाच्या दोन घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटनांमध्ये धारदार शस्त्राने वार करून सदर व्यक्तींचा खून करण्यात आला आहे. हे दोन्ही खून करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. दरम्यान, घटनेनंतर हडपसर आणि कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पहिल्या घटनेत हडपसर परिसरातील चिकन विक्रेता आकाश लक्ष्मण भोसले (24) याचा खून करण्यात आला. आज (सोमवार) दुपारच्या सुमारास अज्ञात आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याचा निघृण खून केला. घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हेही वाचा - चिंताजनक! राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ७० पोलिसांचा मृत्यू
कोथरूड परिसरात घडलेल्या दुसऱ्या घटनेत एका गॅरेज चालकाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करत त्याचाही निघृण पद्धतीने खून करण्यात आला. हल्ला केल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. माहिती मिळताच कोथरूड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला असून त्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान दिवसाढवळ्या घडलेल्या या खुनांच्या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. लॉकडाऊन मधून शिथिलता मिळाल्यानंतर पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दरम्यान आज झालेले दोन्ही खून पूर्ववैमनस्यातून झाले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.