पुणे - भारतात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून, हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत. हे सर्व होत असताना रुग्णांच्या सेवेत असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची भयंकर परिस्थिती आहे. प्रत्येकालाच स्वतःची व कुटुंबाची काळजी वाटत आहे. आरोग्य, पोलीस, मनपा कर्मचारी हे कोरोना योद्धे निस्वार्थपणे लढा देत आहेत. कोविडशी लढताना, जीवाची पर्वा न करता सर्व सामान्यांना जीवनदान देताना काही डॉक्टर्स, आरोग्य सेवकांना कोरोनाची लागण झाली. काही मरण पावले. मात्र तरीही, न घाबरता आपले कर्तव्य बजावण्यासाठी हे योद्धे पुन्हा मैदानात उतरले असून, आपली सेवा बजावत आहेत.
4 महिन्याच्या बाळाला घरी ठेऊन पुन्हा कामावर रुजू
पुणे जिल्ह्यातील शेलपिंपळगावातील आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका शोभा दौंडकर गेले अनेक दिवसांपासून ह्या शेलपिंपळगाव आरोग्य केंद्राच्या मार्फत रुग्णांना सेवा देत आहेत. गरोदर असतानाही सुट्टी न घेता डिलिव्हरी होण्याच्या आधल्या दिवसापर्यंत त्या कोरोना महामारीत रुग्णांना सेवा देत होत्या. डिलिव्हरी झाल्यानंतर थोडेच दिवस विश्रांती करून त्या आपल्या 4 महिन्याच्या बाळाला घरी ठेऊन पुन्हा कामावर रुजू झाल्या.

घरच्यांचा कामावर जाण्यास विरोध असतांनाही, जबादारी पार पाडण्यासाठी झाल्या कामावर रुजू
'संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना मी घरी बसावे कसे? हे माझ्या बुद्धीला आजिबात योग्य वाटत नव्हते. जेव्हा मी फिव्ह ओपीडीमध्ये माझी जबाबदारी पार पाडत होते, तेव्हा मला भीती वाटत नव्हती. पण ज्या वेळी मी घरी जायला निघायचे त्या वेळी मला खुप भीती वाटत असे, कारण माझ्या मुळे माझ्या पोटातील बाळाला किंवा घरच्यांना कोणताही त्रास झाला तर कसे होईल? असे अनेक प्रश्न मला पडायचे'. असे शोभा म्हणाल्या आहेत. प्रसूती सुट्टीवर असताना कोरोनाचा संसर्ग वाढला तेव्हा त्यांना त्यांची जबाबदारी शांत बसू देत नव्हती, म्हणून मग त्यानी पुन्हा फिल्ड वर येण्याचा निर्णय घेतला. घरात लहान बाळ असताना कामावर जाण्यास घरचे सगळे विरोध करत होते. तरीही त्यांना समजावून, स्वतःची जबादारी डोळ्यासमोर दिसत असल्याने त्या कामावर रुजू झाल्या. शोभा ज्या दिवसापासून रुजू झाल्यात त्या दिवसापासून आजपर्यंत त्यांनी एकही सुट्टी घेतलेली नाही. मात्र इतके दिवस काम करूनही जे मानधन दिले जाते ते ही तुटपुंजे असल्याने घर चालवायचं कसे असाही प्रश्न त्यांना पडतो. शासनाने आरोग्य सेविकांना कायमस्वरूपी कामावर रुजू करून घेतले पाहिजे, असे त्यांच्यासह सर्वच आरोग्य सेविकांचे मत आहे.
हेही वाचा - LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..