पुणे - पुण्यातील कोंढवा येथील कृष्णाई इमारतीमध्ये आई-वडिलांनी स्वतःच्या मुलाला 22 श्वानांसोबत कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता याप्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. आई-वडिल हे श्वान प्रेमी होते, त्यामुळे त्यांनी त्यांच्याच घरात श्वान पाळायला सुरुवात केली होती. या श्वानांमध्ये मुलाला कोंडून ठेवले होते, अशी माहिती समोर आली ( Boy Locked With 22 Dogs In Kondhwa Pune ) आहे.
याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले की, मुलाचे पालक हे आम्ही श्वान प्रेमी आहोत, असे सांगत आहेत. त्यामुळे त्यांनी घरात श्वान पाळले होते. त्याची संख्या 22 पर्यंत गेली. मात्र, ते खरच श्वान प्रेमी आहेत का? हे तपासात समोर येईल. तसेच, येथील इमारतीमधील राहणाऱ्या रहिवासीयांनी तक्रार केली होती. मात्र, त्या पिडीत मुलाच्या पालकांनी, असे का केलं? याचा तपास पोलीस करत आहे. पण, प्राथमिक माहितीत पालक थोडेसे विक्षिप्त असल्याचे तपासात समोर आले आहे.
'वागणे श्वाना सारखे' - कोरोनाच्या काळात लॉकडाऊन लागल्याने तो मुलगा बराच काळ श्वानांसोबत घरातच बंदिस्त होता. मात्र, त्यानंतर ज्यावेळी त्याची शाळा सुरु झाली, तेव्हा त्याचे वागणे श्वानासारखे झाले. त्याच्या अंगातून वास येत होता. तो इतर विद्यार्थ्यांना चावत देखील होता, अशी माहिती शाळेने पोलिसांना दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. लवकरच त्याबाबत उलगडा होईल, असेही सरदार पाटील यांनी म्हटले आहे.
मुलाला रुग्णालयात ठेवले - ही माहिती समोर आल्यानंतर कोंढवा पोलिसांनी आई-वडिलांना अटक केली आहे. त्यांना आज ( 12 मे ) न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे मुलावार मोठा परिणाम झाला आहे. त्याला सध्या रुग्णालयात ठेवण्यात आले असून, समुपदेशनाला पाठवण्याची गरज असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा - Sharad Pawar : भाजपने केलेल्या टिकेला शरद पवारांचे प्रत्त्युत्तर; म्हणाले, 'या कवितेत कष्टकऱ्यांच्या...'