पुणे - शहरात सध्या लसीचा तुटवडा आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून लसीचा तुटवडा शहरात जाणवत असून लसीकरण केंद्रावरून नागरिकांना परत जावे लागत आहेत. अनेक नागरिकांचे दुसरे डोस असल्याने हे नागरिक लसीकरण केंद्रावर आले होते. मात्र लसच उपलब्ध नसल्याने त्यांना परत जावे लागत आहे. काही सरकारी लसीकरण केंद्रावर अल्प प्रमाणात लस उपलब्ध होती, मात्र इतर नागरिकांना लस मिळू शकली नाही.
शहरात 6 लाख नागरिकांचे लसीकरण
शहरात सध्या 12 ते 13 हजार नागरिकांना लसीसाठी असणाऱ्या टोकनचे वाटप झालेले आहे. मात्र टोकन प्रमाणे लसीकरण होताना दिसत नाही. आतापर्यंत पुणे शहरात 6 लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. आता 1 मे पासून लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरू होत आहे, त्याचा ताण सर्व्हरवर आल्याने अनेक केंद्रावर नोंदणी करताना अडचणी येत आहेत. दुसरीकडे आता खासगी रुग्णालयांना लस ही सरकारकडून दिली जाणार नसल्याने नवा प्रश्न उपस्थित झाला आहे. खासगी रुग्णालयांनी आता सरळ सिरम किंवा भारत बायोटेककडून लसी घाव्या, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयासमोर मोठा पेच निर्माण झाला असून खासगी रुग्णालयातील लसीकरण पूर्णपणे थांबल्याचे चित्र आहे. लस नसल्याने नागरिक हवालदिल झाले असून आता केव्हा लस मिळणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.