पुणे - पुणे महापालिका निवडणुकीचे वातावरण आतापासूनच तापायला सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 100 हून अधिक नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला आहे. पूणे महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांची गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. त्यानंतर आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
महापालिका निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहेत. निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष तयारीला लागला आहे. नुकताच पूणे महापालिकेत 23 गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून निवडणुकीच्या तोंडावर वार्ड रचनेत बदल केला जाऊ शकतो, असा आरोपीही यावेळी गिरीश बापट यांनी केला आहे.
काठी पक्षाच्या हाती
2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीदरम्यान नगरसेवक गणेश बिडकर यांच्या कार्यक्रमात गिरीश बापट यांनी काठी माझ्याच हाती आहे, आणि मला माहित आहे ती कशी फिरवायची असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याची तेव्हा चांगलीच चर्चा झाली होती. याचा फटका बिडकर यांना बसला होता. मात्र यावेळी काठी पक्षाच्या हातात असून, आम्हाला महापालिकेत पुन्हा सत्ता मिळवायची असल्याचे ते म्हणाले आहेत. या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते गणेश बिडकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे यांची उपस्थिती होती.