पुणे - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी भारतीय जनता महिला मोर्चाच्यावतीने पुण्यात आंदोलन करण्यात आले. पुण्यातील कोथरूड येथील आशिष गार्डन चौक ते कोथरूड पोलीस स्टेशन येथे मोर्चा काढत हे आंदोलन करण्यात आले. संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, पूजा चव्हाणला न्याय द्या, महाविकास आघाडीचा निषेध असो, अशी घोषणाबाजी करत महाविकास आघाडी सरकारचा या महिला मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.
संजय राठोडांविरोधात भाजप महिला कार्यकर्त्यांचा मोर्चा भाजपतर्फे राज्यभर आंदोलन-पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकावं या मागणीसाठी भाजपतर्फे आज राज्यभर आंदोलन करण्यात आलं आहे. पुण्यातही भाजप महिला आघाडीच्यावतीने आंदोलन करण्यात आलं आहे.
पूजा चव्हाणला न्याय मिळालाच पाहिजे-
पुण्यात काही दिवसांपूर्वी पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याची टिका विरोधी पक्ष भाजपाकडून वारंवार होत आहे. 20 दिवस झाले तरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. पोलिसांनी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करावं, अस निवेदन यावेळी भाजप महिला आघाडीच्यावतीने कोथरुड पोलिसांना देण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पूजा चव्हाणला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
हेही वाचा- काय म्हणतोय राज्यातील कोरोना? पाहा दिवसभरातील कोरोनासंदर्भातील घडामोडी