पुणे - लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या जवळपासही दिसणार नाहीत. निवडणुकीनंतर राफेलची चौकशी होईल असे सांगत मोदी योग्य जागी दिसतील, असा दावा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सध्या भाजपकडून हरप्रकारे विरोधकांना नामोहरम करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यासाठी मुख्यमंत्री आणि अमित शाह हे साम, दाम, दंड भेदाचा वापर करत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांनी अचानक पक्षबदल केला. मात्र, कारखाने, शिक्षण संस्था यांच्यावरील कारवाई सर्वांना माहित आहे. सरकारकडे कुंडली आहे तर, मग सरकारने कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित करून सरकार ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
भाजपने मोठा गाजावाजा करत जाहीरनामा प्रसिद्ध केला. निवडणुका आल्यावरच भाजप राम मंदिराचा मुद्दा पुढे करतात. मात्र, निवडणुकीनंतर काहीच होत नाही. एकाच मुद्यांवर वारंवार तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. ही निवडणूक व्यक्तिकेंद्रीत करून डायव्हर्ट करण्याचा भाजपचा प्रयत्न असून पंतप्रधान व्यक्तिगत टीका करत असल्याचे चव्हाण म्हणाले.
राज ठाकरे यांच्या भाषणावर बोलताना कोणत्याही व्यक्तीने नरेंद्र मोदींचे खरे रुप उघड केले. मोदींचा पर्दाफाश केला तर स्वागतार्ह आहे. मोदींना सत्तेपासून दूर करणे, ही राज ठाकरे आणि आमचीही भूमिका असल्याचे चव्हाणांनी म्हटले. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना विखे यांच्या पक्षांतरबाबत मला काही माहिती नाही. या प्रकरणी राष्ट्रवादीचे विखेंवर आक्षेप असतील तर योग्य ठिकाणी मागणी नोंदवावी, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.