पुणे - गुढीपाडव्याच्या दिवशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे काढा अन्यथा हनुमान चालीसा लावू असा आदेश दिला होता. त्यानंतर राज्यातील राजकारण तापले होते. पुण्यात तर मनसैनिकांमध्ये गटबाजी (Pune MNS) पडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर आता पुण्यात थेट राज ठाकरे (Raj Thackeray in Pune) यांच्याहस्ते हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) निमित्ताने महाआरती (MahaAarti) आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण (Hanuman Chalisa recitation) होणार आहे.
खालकर चौक मारुती मंदिरात कार्यक्रम - पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात हनुमान जयंती उत्सव साजरा होणार आहे. या उत्सवास राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तिथे राज ठाकरे यांच्या शुभहस्ते महाआरती होणार आहे. तसेच सामूहिक हनुमान चालीसा पठण देखील होणार आहे, अशी माहिती मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी दिली आहे.
राज ठाकरे यांच्याहस्ते महाआरती आणि हनुमान चालीसा पठण - गेली दीड शतक खालकर मारुती मंदिर हे भाविकांचे श्रद्धा स्थान राहिले आहे. हे मंदिर जुने झाल्यामुळे आणि एका अपघातात मंदिराची भिंत पडल्यामुळे २० वर्षापूर्वी मंदिराच्या बांधकामाची सुरुवात राज ठाकरे यांच्याहस्ते झाली होती. त्यानंतर आता यंदाच्या हनुमाम जयंतीच्यादिवशी राज ठाकरे यांच्याहस्ते महाआरती आणि हनुमान चालीसा होणार आहे, असे देखील यावेळी शिंदे यांनी सांगितले. जर ईदनंतर मशिदीवरील भोंगे नाही हटले तर मनसैनिक रस्त्यावर उतरणार, असे देखील यावेळी शिंदे यांनी सांगितले आहे.