पिंपरी- चिंचवड - राज्यात करोना बाधित रुग्णांची संख्या दर दिवशी सातत्याने आणि वेगाने वाढत आहे. या दुसऱ्या लाटेला अटकाव घालण्यासाठी, राज्य सरकारने गेल्या रविवारपासून करोना प्रतिबंधक नव्या नियमावलींची यादी जाहीर करून, तिची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला आणि आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. मात्र, लोकांची नियम पाळण्याविषयीची उदासीनता, बाधित रुग्णांची वाढती संख्या, अपूरी आरोग्य यंत्रणा या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात परत एकदा कडक लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत.
पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी मात्र लॉकडाऊनला विरोध केला असून, गेल्या वर्षीच्या लॉकडाऊन मधून उद्योगनगरी आणि जनता आत्ता कुठे सावरू लागली आहे, त्यांना जर परत लॉकडाऊन सारख्या परिसस्थितीला सामोरे जावे लागले तर, परत तेच चित्र दिसेल जे मागील वर्षी पाहायला मिळाले होते, अशी काळजी व्यक्त केली आहे. त्यांनी नागरिकांना लॉकडाऊन टाळायचा असेल, तर सरकारने घालून दिलेल्या करोना विषयक नियमांचे पालन करून, त्यांची व त्यांच्या कुटुंबाची काळजी घेण्याचे कळकळीचे आवाहनही केले आहे.
आज लांडगे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी, त्यांनी नागरिकांना स्पष्ट संदेश दिला की, लॉकडाऊन टाळणे हे आपल्याच हातात आहे. नागरिक निष्काळजीपणे स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा जीव, करोना प्रतिबंधक विषयक नियमांचे पालन न करून धोक्यात घालत आहेत. यामुळे करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, त्यामुळे प्रशासनाला कठोर पावले उचलावी लागत आहेत.
यावेळी त्यांनी सामाजिक संस्थांना, गणेश मंडळांना आणि, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना, करोना लसीकरणाविषयी शहरात जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे, सोबतच 45 वर्षांवरील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचून, त्यांना त्यांच्या जवळच्या लसीकरण केंद्रांपर्यंत जाण्यासाठी प्रेरित करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे. राज्यात प्लाज्मा आणि रक्ताचा तुटवडा आहे व तो वाढू शकतो हे लक्षात घेऊन त्यांनी नागरिकांना, प्लाज्मा दानाचे देखील आवाहन केले आहे. त्यांनी नागरिकांच्या आणि उद्योगनगरीतल्या सर्व कर्मचारी, कामगार, मजूर आणि सर्व वर्गाच्या लोकांच्या धैर्याचे, सहनशक्तीचे आणि संयमाचे देखील यावेळी कौतुक केले.