पुणे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उगाच आरोप केले जातात. राज्यासह उभ्या देशाला उद्धव ठाकरे हे कसे आहेत हे माहिती आहे. त्यांची प्रतिमा कोणी मलीन करू नये, अशी टीका राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भाजपा नेते किरीट सोमैया यांच्यावर केली आहे. किरीट सोमैया यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेला प्रतिउत्तर देताना उदय सामंत यांनी ही टीका केली आहे.
काय आहे प्रकरण?
किरीट सोमैया हे काही दिवसांपूर्वी भाजपा सत्तेत असलेल्या पुणे महानगरपालिकेत जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये झालेल्या घोाळ्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी आले होते. त्याचवेळी पुण्यातील शिवसैनिकांनी किरीट सोमैया यांना महापालिकेच्या गेटवरच अडवत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी गोंधळ इतका वाढला की धक्काबुक्की सुरू झाली. त्यानंतर सोमैया हे पुणे महानगरपालिकेच्या पायरीवरच कोसळले. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. माझ्यावर हल्ला हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याच सांगण्यावरून झाला असल्याचे सांगतच मला जिवे मारण्याचे आदेश देण्यात आले होते, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपांना उत्तर देताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा कोणी मलीन करू नये, असे प्रतिउत्तर दिले आहे.
'विनाकारण वाद निर्माण करु नये'
कर्नाटकात झालेल्या हिजाब प्रकरणावर देखील राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भाष्य केले आहे. राज्यात कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कुठलेच कृत्य विद्यार्थ्यांनी करू नये, अशी विनंती करत वाद होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन देखील विद्यार्थ्यांना केले आहे.
प्रा. पंडित प्रकरणी केंद्राला पत्र लिहिणार
उदय सामंत यांनी सांगितले की, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्लीच्या कुलगुरू (व्ही-सी) म्हणून संतश्री पंडित यांची नियुक्ती का करण्यात आली याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला पत्र लिहिणार आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळातील वादग्रस्त गोष्टींची चौकशी करणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. पुणे विद्यापीठात पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री बोलत होते.
हेही वाचा - Amit Shah Campaign in Goa : गोव्यात रणधुमाळी; केंद्रीय गृहमंत्र्यांकडून भाजपचा घरोघरी प्रचार सुरू