पुणे - आता भारतरत्न पुरस्कार दुर्दैवाने वाटेल तसा वाटला जात आहे. महात्मा फुलेंना तो मिळाला नाही म्हणून त्यांचं मोठेपण कमी होत नाही. या देशात तीनच महात्मा आहेत. त्यामुळे महात्मा फुले यांना भारतरत्न मिळाला नाही म्हणून त्यांचं मोठेपण कमी होत नाही, असे मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. पुण्यात महात्मा फुले वाडा येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले यांच्या 130व्या पुण्यतिथीनिमित्ताने पदमश्री डॉ. तात्याराव लहाने यांना छगन भुजबळ यांच्या हस्ते महात्मा फुले समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
विरोधकांचे कामच आहे विरोध करणे -
महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर विरोधकांनी सरकारच्या एक वर्षाच्या कामगिरीवर निशाणा साधत सातत्याने सत्ताधारी पक्षावर टीका करण्यात येत आहे. विरोधकांच्या या टीकेला मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर देत विरोधकांचे कामच सत्ताधाऱ्यांना विरोध करणे आहे. सरकारने या वर्षभरात जनतेसाठी खूप काम केले आहे. सरकार मजबुतीने चाललं आहे, असे यावेळी छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणाला कधीच विरोध केला नाही - छगन भुजबळ
आम्ही मराठा आरक्षणाला कधीच विरोध केला नाही. आघाडी सरकार असो वा फडणवीस सरकार, आम्ही कायद्याला विरोध केला नाही. मात्र, मराठा समाजातील काही नेते म्हणताहेत की मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं. त्यासाठी ते कोर्टात गेलेत. तेव्हा ओबीसींना जागृत करणे आमचं काम आहे. ते आम्ही करतोय. मराठा आरक्षणाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला हात लागू नये ही आमची भूमिका आहे, असेही यावेळी छगन भुजबळ म्हणाले.