पुणे - सात ते आठ रुग्णालये फिरल्यानंतरही बेड उपलब्ध न झाल्यामुळे धायरीतील एका रुग्णाने मंगळवारी रात्री कुटुंब आणि मित्रांसह अलका चौकात ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर या रुग्णाला विश्रांतवाडीतील एका रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले होते. परंतु, त्या रुग्णाचा आज दुपारच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.
धायरीतील तरुणाला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास सह्याद्री रुग्णालयात आणले होते. त्याठिकाणी त्याची कोरोना चाचणी केल्यानंतर रुग्णालयात बेड नसल्याचे कारण देत अॅडमिट करून घेण्यास नकार देण्यात आला होता. त्यानंतर बेड मिळावा यासाठी सात ते आठ वेगवेगळी रुग्णालयं त्याच्या कुटुंबीयांनी पालथी घातली. त्यांना ऑक्सिजनयुक्त बेड मिळालाच नाही. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईक आणि कुटुंबांनी डेक्कन परिसरातील अलका चौकात आंदोलन केले होते.
आंदोलन केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांनी एकत्र येऊन त्या रुग्णाला विश्रांतवाडीतील एका रुग्णालयात बेड मिळवून दिला होता. मंगळवारी रात्रीपासून या रुग्णावर उपचार सुरू होते. आज दुपारच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगितले. पुण्यासारख्या शहरात अशाप्रकारची घटना घडणे खेदजनक असल्याचे त्यांनी सांगितले. हा रुग्ण पाच ते सहा रुग्णालयात जाऊन आल्यानंतरही त्याला ऑक्सिजन बेड का मिळाला नाही? याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कालची परिस्थिती पाहता शहरातील महापालिकेच्या अथवा खासगी रुग्णालयात ऑक्सिजन बेड नाहीतच अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे असा प्रकार का घडला याची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मोहोळ यांनी सांगितले.