पुणे - मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरुवारी (4 फेब्रुवारी) पुण्यातून संघर्ष यात्रा सुरू करण्यात आली. पुणे ते साष्ट पिंपळगाव अशी ही मराठा संघर्ष यात्रा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे.
हेही वाचा -...मग तुम्ही तरी शेतकऱ्यांविषयी बोला ना, छगन भुजबळांचा सेलिब्रिटींना चिमटा
आरक्षणाबाबत सरकारची भूमिका दुटप्पी असल्याने न्यायालयामध्ये त्याला स्थगिती मिळाली आहे. येत्या पाच फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार असून, आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी ही संघर्ष यात्रा काढण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
मराठा संघर्ष यात्रेचा मार्ग -
गुरुवारी निघालेली ही संघर्ष यात्रा 5 फेब्रुवारीला जालना येथे पोहचेल. आज ही संघर्ष यात्रा पुण्यातल्या कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून निघाली आहे. महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यात्रेला सुरुवात झाली आहे. पुण्यातल्या शिवाजीनगर मार्गे येरवडा, नगर रोड, वाघोली, शिक्रापूर, रांजणगाव, शिरूर, सुपा, अहमदनगर, अमळनेर मार्गे यात्रा बीड येथे मुक्कामी जाणार आहे. शुक्रवारी 5 फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता बीड येथून पुन्हा यात्रेला सुरुवात होईल आणि बीड ते पाडळसिंगी, गेवराई, शहागड मार्गे जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथे यात्रा पोहोचेल. या ठिकाणी सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. न्यायालयाचा काय निर्णय होतो त्यानंतर पुढील दिशा याच ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने ठरवली जाणार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - 'शेतकऱ्यांच्या वीज थकबाकीपैकी 15 हजार कोटी सरकार भरणार, विलंब आकार माफ'