पुणे - राज्य सरकारने देऊ केलेल्या ईडब्ल्यूएस आरक्षणावरून मराठा समाजातील विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. हे देऊन आघाडी सरकारने मराठा समाजाचा अपमान केला आहे, असा आरोप या संघटना करत आहेत. तसेच आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या 42 तरुणांचा अपमान केल्याचे मराठा समाजाच्या नेत्यांनी म्हटले. मराठा समाजाच्या पाठीत या आघाडी सरकारने खंजीर खुपसल्याची टीकाही मराठा संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
शनिवारी पुण्यात विविध मराठा संघटनांच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. मराठा समाजाची मागणी नसताना आघाडी सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षण का दिले, असा सवाल उपस्थित करण्यात आला. हा निर्णय पूर्णपणे मराठा समाजाच्या विरोधात असून ईडब्ल्यूएस आरक्षणात बहुसंख्य मराठीत बसणार नसल्याने हे आरक्षण फसवे आहे, असा आरोप मराठा नेत्यांनी केलाय.
आघाडी सरकारने ईडब्ल्यूएस आरक्षण दिल्यामुळे न्यायालयात सीबीसी आरक्षणाच्या केसवर त्याचा परिणाम होणार आहे. यामुळे हा खटला कमकुवत होईल, असे संघटनेचे म्हणणे आहे. यापुढे मराठा समाजाचे मोर्चे शांततेत निघणार नाहीत, असा इशारा देखील या संघटनांकडून देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देणार नाही असे सांगणारे मंत्री विजय वडेट्टीवार हे काय न्यायाधीश आहेत का, अशा प्रश्न मराठा नेत्यांनी उपस्थित केला.
वडेट्टीवार जाणीवपूर्वक मराठा समाजाला सुचवत आहेत. ते मराठा विरुद्ध बहुजन संघर्ष निर्माण करू पाहत आहेत. मराठा समाजाच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोप या संघटनांनी केला असून वडेट्टीवार बोलत असलेली भूमिका ही सरकारची भूमिका आहे का, हे देखील आघाडी सरकारने स्पष्ट करावे, असे ते म्हणाले. सरकारच्या आरक्षणाच्या निर्णयाविरोधात आगामी काळात सर्व मराठा संघटना आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे देखील या वेळी सांगण्यात आले.