राजगुरुनगर (पुणे) : निसर्ग चक्रीवादळामुळे शेतीसह शेतीचे जोडव्यवसाय असलेल्या ठिकाणचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राजगुरुनगर तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे उभी पिके जमीनदोस्त झाली आहेच. त्यासोबतच ठिकठिकाणी अनेक घरांचे नुसान झाले असून जनावरांचे निवारे भुईसपाट झाले आहेत. तालुका महसूल विभागाकडुन या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यास सुरुवात केल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली आहे.
हेही वाचा... निसर्ग चक्रीवादळाचा फळबागांना तडाखा; जुन्नरचा आंबा, केळी बागा भुईसपाट
कोरोनाच्या महामारीत शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आता निसर्ग चक्रीवादळात उन्हाळी बाजरी, फळबागा, जनावरांचे खाद्य, भाजीपाला, जनावरांच्या निवाऱ्यांची ठिकाणे आदींचे खेड (राजगुरुनगर) तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळेच शासकीय पातळीवर नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्यास सुरुवात केली आहे.
चक्रीवादळाचा परिणाम तालुक्यातील प्रत्येक गावात झाला आहे. तलाठी, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांनी नुकसानग्रस्त ठिकाणी प्रत्येक्ष जाऊन तेथील पाहणी करुन तत्काळ पंचानामा करण्याच्या सुचना तहसीलदारांनी दिल्या आहेत.