पुणे - पुणे हे ऐतिहासिक शहर आहे आणि या शहरामध्ये आगाखान पॅलेस (Aga Khan Palace Pune) हे ऐतिहासिक असे स्मारक आहे. 19 एकरमध्ये असलेल्या या आगाखान पॅलेसच्या या ठिकाणी महात्मा गांधी (Mahatma Gandhi) ६ वर्षे राहिले. राजकैदी म्हणून महात्माजींच्या पत्नी कस्तुरबा गांधी उर्फ बा व त्यांचे स्वीय सहाय्यक महादेव भाई देसाई यांचे या ठिकाणी निधन झाले. त्या दोघांची समाधी याच ठिकाणी असून, महात्मा गांधी यांची समाधी देखील या ठिकाणी आहे. पण, असे वैभव लाभलेल्या या राष्ट्रीय स्मारकातील पाणी (Aga Khan Palace water cut) गेल्या दोन महिन्यांपासून महापालिकेच्यावतीने बंद करण्यात आले आहे.
वकील सुनील करपे यांनी आवाज उठवला : गेल्या 5 वर्षांची पाणीपट्टी रुपये 1 कोटी 80 लाख भरली नाही, म्हणून महापालिकेच्यावतीने आगाखान पॅलेसमधील पाणी बंद करण्यात आलं आहे. याच्या विरोधात स्थानिक नागरिक वकील सुनील करपे यांनी आवाज उठवला असून, जर महापालिकेने राष्ट्रीय स्मारक असलेल्या या आगाखान पॅलेसमधील पाणी जोडले नाही तर या विरोधात न्यायालयात जाणार आहे, नाहीतर सत्याग्रह मार्गाने आंदोलन करू, असा इशारा यावेळी करपे यांनी दिला आहे.
पिण्यासाठी व झाडांना पाणी सुमारे दोन महिन्यापासून बंद : राष्ट्रीय स्मारक आगाखान पॅलेस हे आरकेलॉजी डिपार्टमेंटकडे वर्ग झाल्यानंतर व्यक्तिश: कोणाचेही याठिकाणी लक्ष नसून महानगरपालिकेने बिल भरले नाही म्हणून पाणी बंद केले आहे. म्हणजे, या ठिकाणी झाडांना व येणाऱ्या देशी व विदेशी नागरिकांना पिण्यासाठी व झाडांना पाणी सुमारे दोन महिन्यापासून नाही. महानगरपालिका याकडे लक्ष देत नसून राष्ट्रीय स्मारकाची मानहानी व साक्षात गांधीजींचा अपमान करण्यात येत आहे. महापालिकेने त्वरित पाणी सुरू करावे व येथील झाडे वाचवावी, अशी मागणी देखील यावेळी करपे यांनी केली.

दोन महिन्यांपासून येथील पाणी बंद : 19 एकरमध्ये असलेल्या या आगाखान पॅलेसला एक विशेष महत्व असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देश विदेशातील पर्यटक पाहणी करिता येत असतात.या परिसरात मोठ्या संख्येने झाडे आणि उद्यान आहे. गेल्या 2 महिन्यांपासून येथील पाणी बंद केल्याने येथील उद्यानातील झाडे ही सुकायला लागली आहेत. त्यामुळे महापालिकेने याकडे लक्ष द्यावे आणि पुण्याचे वैभव असलेल्या या आगाखान पॅलेसमधील झाडांना वाचवावे, असे आवाहन देखील यावेळी करपे यांनी केले आहे.

आगाखान पॅलेसची पाणीपट्टी थकित : राष्ट्रीय स्मारक असलेल्या या आगाखान पॅलेसची पाणीपट्टी ही गेल्या पाच वर्षापासून थकीत आहे. एकूण 1 कोटी 80 लाख रुपये हे थकीत आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, 5 वर्षांपासून पाणीपट्टी थकीत असल्याने फेब्रुवारी महिन्यात फक्त उद्यानमधील पाणी कट करण्यात आले आहे. त्यांना जर उद्यानामध्ये पाणी वापरायचे असेल तर टँकरद्वारे ते पाणी वापरू शकतात, असे यावेळी पाणी पुरवठा अधिकारी अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले आहे.

आरकेलॉजी डिपार्टमेंटमधील लोकं लक्ष देत नाही, म्हणून एवढी थकबाकी झाली आहे. महात्मा गांधी प्रेमी असल्याने मी याचा पाठपुरावा करत आहे. जो पर्यंत पाणीपुरवठा सुरू होत नाही, तो पर्यंत मी पाठपुरावा करणार आहे, असे देखील यावेळी करपे यांनी सांगितले आहे.