पुणे - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद आहेत. यामुळे अवैधरित्या दारू बनवणाऱ्या ठिकाणांवर उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या आदेशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत आतापर्यंत 267 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसेच एकूण 76 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा... सोलापूर पोलिसांचा दणका! विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई, 500 वाहने घेतली ताब्यात
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुणे जिल्ह्यात धडक कारवाई करण्यात आली आहे. अवैद्य दारूविक्री प्रकरणी आतापर्यंत 267 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 76 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच गेल्या चार दिवसात 41 कारवाया करण्यात आल्या आहेत. या कारवाईत तेरा लाख पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 31 मार्च ते चार एप्रिलपर्यंत 41 ठिकाणी हातभट्टी अड्ड्यांवर धडक कारवाई केली गेली. पाच दिवसात या प्रकरणी पंधरा जणांना अटक केली आहे. तसेच विभागाकडून कारवाई आणि धाडसत्र सुरू असल्याने गुन्ह्यांचा आकडा वाढणार आहे. अवैद्य दारूनिर्मिती, अवैद्य दारूविक्री आणि वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे यांनी दिला आहे.