पुणे : राज्यात सध्या पावसाने हाहाकार सुरू असतानाच मुंबई वेधशाळेने पुढचे चार दिवस राज्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली
दरम्यान पुणे जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील मावळ आणि मुळशी तालुक्यातील अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसाची हीच परिस्थिती पुढचे चार दिवस अशीच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुणे जिल्ह्यातील गुंजवणी धरण व घिसर परिसरात पाण्याची आवक वाढत असल्याने पाणीपातळीमध्ये वाढ होत असल्याने विद्युत गृहातून 200 क्यूसेक वेगाने प्रवाह सुरू करण्यात येत असून धरणातून एकूण विसर्ग 200 क्यूसेक येत आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो, त्यामुळे नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी, गुंजवणी नदी पात्रात कुणीही जाऊ नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुणे जिल्हयात 22 जुलै रोजी झालेल्या पावसामुळे नुकसानीबाबतचा अहवाल
आंबेगाव
आंबेगाव तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 17.60 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मौजे कोलतावडे येथे गावाच्या रस्त्यावर दरड कोसळुन मुख्य रस्ता बंद झाला आहे. सदयस्थितीत रस्ता सुरळीत करण्याचे काम सुरु आहे. पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला असून परिस्थिती सामान्य आहे. कोणत्याही प्रकारची मनुष्य व पशु हानी झालेली नाही.
भोर तालुका
तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 41.25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महाड महामार्गावरील वरंधा घाटात दरड कोसळून रस्त्यावर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात आला होता, परंतू काल मध्यरात्री पुन्हा दरड कोसल्यामुळे जेसीबी लावून ढिगारा उपसण्याचे काम सुरु आहे. साळुंगण या ठिकाणी डोंगराचा काही भाग वाहून आलेला असून त्यामुळे स्मशानभूमी पूर्णपणे त्याखाली गाडली गेली असून मातीचा ढिगारा दोन जेसीबीच्या मदतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने काम सुरू आहे. कनकरवाडी गावालगतचा ओढा तुंबल्याने व पावसाचा जोर असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहे.
मावळ तालुका
तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 171.34 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रस्ते अडथळे दूर करण्यात आले आहेत, कुटुंब स्थलांतरित करण्यात आले आहेत. पाऊस सद्यस्थितीत रिमझिम सुरू आहे.
खेड तालुका
तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 14.78 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आरळा कळमोडी धरण 100% भरले असून सद्यस्थितीत पावसाचा जोर ओसरला आहे. मौजे नायफड येथील मातीचा कच्चा बंधारा फुटलेल्या याचा पंचनामे कृषी अधिकारी करत आहेत. तर परिस्थिती सामान्य असल्याचे सांगण्यात आले आहे.
हवेली तालुका
तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 12.20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. आज दुपारपासून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
मुळशी तालुका
तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 166.33 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मौजे माले येथील परिस्थिती सामान्य असून, मदत पोहचली असून इतर परिस्थिती सामान्य आहे.
वेल्हा तालुका
तालुक्यात 22 जुलै रोजी सरासरी 139 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मौजे जाधववाडी येथे भट्टी वाघदरा ते पासली दे दरम्यान भूस्खलन होऊन रस्ता बंद होता. तो पूर्ववत करण्यात आला आहे. जिल्हयातील या ठिकाणच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु आहे.
हेही वाचा - Maharashtra Floods : राज्यात अतिवृष्टी, पुराचे 54 बळी; पंतप्रधानांकडून मदतीची घोषणा