पुणे - कोरोनाच्या काळात सर्वच क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. तसाच फटका पुण्यातील मिठाई व्यापाऱ्यांनाही बसला आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार बंद असल्याने मिठाईची दुकानेही बंद ठेवावी लागली. त्यामुळे दुकानामध्ये पडून असलेला कच्चा माल फेकून देण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे. तयार असलेली मिठाई काही ठिकाणी वाटण्यात आली तर काही मिठाई बंद असल्याने खराब झाली.
मिठाई व्यावसायिकांना लॉकडाऊनमुळे मोठा तोटा सहन करावा लागत आहे. आजही शहरातील अनेक मिठाई व्यावसायिकांच्या दुकानातील गावाला गेलेले कामगार परत आलेले नाहीत. श्रावण महिना सुरू असूनही आणि विविध धर्मीयांचे सण-उत्सव असतानाही 'अनलॉक'मध्ये फक्त ३० ते ४० टक्के ग्राहक मिठाई खरेदीसाठी येत आहेत.
पुण्यातील प्रसिद्ध मिठाई व्यावसायिक काका हलवाई यांनाही लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. पुण्यात विविध ठिकाणी काका हलवाई यांचे दुकान आहे. काका हलवाई यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मिठाई तयार केली जाते. पण, २३ मार्चनंतर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे तयार करून ठेवलेली मिठाई आणि कच्च्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही कच्चा माल फेकून देण्यात आला तर, काही तयार केलेली मिठाई दत्त मंदिर येथे बाहेर गावाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या विद्यार्थी भोजन योजनेसाठी देण्यात आली.
हेही वाचा - मावळमधील कासारसाई धरण शंभर टक्के भरले; 1 हजार 200 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग
काही कामगार लॉकडाऊनमध्ये घरी गेल्यानंतर अद्याप परत आलेले नाहीत, तर जे होते त्यांची दुकानातच राहण्याची व्यवस्था केली, अशी माहिती काका हलवाईचे पार्टनर युवराज गाढवे यांनी दिली. अनलॉकमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करत पाच-पाच ग्राहक आत सोडले जात आहेत. आत येणाऱ्या ग्राहकांचे सुरुवातीलाच स्क्रीनिंग केले जात आहे. दुकानांमधील कामगारांनाही मास्क, हॅन्डग्लोस तसेच कॅपचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे, असेही गाढवे यांनी सांगितले.
पुणे शहरात लहान मोठे असे मोठ्या प्रमाणत मिठाई व्यावसायिक आहेत. लॉकडाऊनचा फटका जसा या मोठ्या व्यावसायिकांना बसला, तसाच फटका शहरातील छोट्या व्यावसायिकांनाही बसला आहे. अनेक छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याने तयार केलेली मिठाई खराब झाल्याने ती फेकून देण्याची वेळ या व्यावसायिकांवर आली आहे.
हेही वाचा - खडकवासला धरणाचे सर्व दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा