पुणे - सध्याच्या परिस्थितीत राज्यात वेगाने कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत महत्वाचे विधान केले आहे.. लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असतो. त्यामुळे याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे राजेश टोपे यांनी आज मुंबईत सांगितले होते.. यावर प्रतिक्रिया देताना पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मात्र लॉकडाऊन करणे हा पर्याय नसल्याचे सांगत लॉकडाऊनला विरोध दर्शवला.
हेही वाचा - केंद्र सरकारकडून मुख्यमंत्र्यांची मागणी मान्य; ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना मिळणार लस
लॉकडाऊनला महापौरांचा विरोध
महापौर म्हणाले, आजही पुण्यातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे या परिस्थितीत पूर्ण करणे योग्य नाही.. पुण्यातील काही संस्थांनी यापूर्वी सर्वेक्षण करून सादर केलेल्या अहवालात निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्यात यावी असे सांगितले होते. त्यामुळे कोरोनाची रुग्ण संख्या वाढली म्हणून लॉकडाऊन लागू करणे हा त्यावरचा मार्ग नाही. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी हाच त्यावरचा उपाय आहे.
शहरात ज्याप्रकारे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यावर आपण तीन आघाड्यांवर काम करू शकतो. झपाट्याने वाढत जाणारी रुग्णांची संख्या पाहता त्यासाठी सक्षम आरोग्य यंत्रणा उभी करावी लागेल. यामध्ये रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देणे, लसीकरण मोठ्या प्रमाणात करणे, स्वॅब टेस्टची संख्या वाढवणे यासारख्या उपाययोजना करून आपण कोरोना नियंत्रणात आणू शकतो. नियमांची कडक अंमलबजावणी करणे किंवा आणखी काही निर्बंध आणून वाढत्या रुग्ण संख्येला पायबंद घालता येईल, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.
सर्वात शेवटी लसीकरणाचा वेग वाढवला तर कोरोनाला प्रतिबंध घालता येईल.. परंतु आताच्या परिस्थितीत लॉकडाऊन करणे योग्य नाही, असे सांगत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
हेही वाचा - रायगडमध्ये महिलेने धावत्या एसटी बसमध्ये दिला बाळाला जन्म