पुणे - सरकार स्वतःच स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. कोविडमध्ये सरकारने भ्रष्टाचाराचे पाप केले म्हणून रुग्ण वाढले. एकूण रुग्णांपैकी दोन तृतीयांश रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात कोविड वाढण्याची भीती वाटते. राज्यात कोविड रुग्ण कसे वाढतात हे मंत्रालयात किंवा मातोश्रीत बसून कळणार नाही, असा टोला भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी लगावला..
हेही वाचा - मुंबई- रुग्णांच्या संख्येत वाढ होऊनही कोविड सेंटरमधील 60 टक्के खाटा रिकाम्या
किरीट सोमैय्या यांनी आज पुण्यातील ससून रुग्णालयातील लसीकरण केंद्रांची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.
सरकार बेजबाबदार वागते -
किरीट सोमैय्या म्हणाले, लसीकरण पूर्ण होण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. परत रेमडेसिव्हीरचा काळा बाजार होऊ शकतो. आज मुंबई पुण्यात आयसीयू बेड नाहीत, नियोजन करण्याची गरज आहे. लोकांची जबाबदारी सरकार आठवण करून देत असताना स्वतः बेजबाबदार वागत आहे.
हेही वाचा - मुंबई: बँक कर्मचारी संपाने ग्राहकांची गैरसोय
सचिन वाझे उद्धव ठाकरेंसाठी वसुली करणारा माणूस
सचिन वाझे प्रकरणी बोलताना किरीट सोमैय्या म्हणाले, 6 जून रोजी सचिन वाझे यांचे 17 वर्षांचे निलंबन या सरकारने रद्द केले. सचिन वाझेला परत सेवेत घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कमिटी तयार केली होती. कारण उद्धव ठाकरेंना वसुली करण्यासाठी माणूस हवा होता, 50 कोटींचा वसुली करणारा जुना शिवसैनिक हवा होता. असे म्हणत सोमैय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
अनिल देशमुखांना असं काय सापडलं की त्यांनी वाझेंना परत घेतलं?
सोमैय्या म्हणाले, मी शरद पवारांना विचारतो की, राष्ट्रवादी काँग्रेसचा गृहमंत्री असताना 2004 साली वाझेंला निलंबित का केलेे होते? राष्ट्रवादी काँग्रेसचा गृहमंत्री असतानाच वाझेनी राजीनामा दिला होता, परंतु तेव्हा तो स्वीकारण्यात आला नाही. मग आता राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुखांना असं काय सापडलं की त्यांनी वाझेंना परत घेतलं? असा सवालही सोमैय्या यांनी उपस्थित केला.
पोलीस महासंचालकांची हकालपट्टी करा
साधा एपीआय दर्जाचा पोलीस अधिकारी क्राईम ब्रँचची गाडी घेऊन फिरतो. त्यामुळे वाझे हा त्यांचा विशेष माणूस होता हे सिद्ध होते. हे सरकार माफियागिरी करत असून या सर्व घटनेला जबाबदार असलेल्या पोलीस महासंचालक परमवीर सिंग यांची हकालपट्टी करावी आणि गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी याचा जाब द्यावा आणि जनतेला उत्तर द्यावे, अशी मागणीही सोमैय्या यांनी केली.