पुणे - बाणेर (Baner) येथील हाय स्ट्रीट परिसरातून पाच ते सहा दिवसांपूर्वी चार वर्षीय डुग्गू (Duggu) उर्फ स्वर्णम चव्हाण (Swarnav Chavan) या चिमुरड्याचे अपहरण (Kidnapped) करण्यात आले होते. अपहरण झाल्यानंतर या चिमुरड्याला शोधण्यासाठी पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील त्याला शोधण्यासाठी त्याच्या घरच्यांकडून आवाहन करण्यात येत होते. अखेर हा चिमुरडा पोलिसांना पुनावळे (Punawale) येथे सापडला असून, आई- वडिलांकडे त्याला सुखरूप पोहचवण्यात आले आहे.
- पोलिसांची मोठी फौज करत होती तपास -
स्वर्णम हा चार वर्षाचा असून, मागील आठवड्यात बालेवाडीमधून त्याचे अपहरण केले होते. त्यानंतर स्वर्णमचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तयार केली होती. पुणे पोलिसांची मोठी फौज त्याला शोधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होती. गुप्तता पाळून हा तपास सुरू होता. जवळपास ३०० ते साडे तीनशेच्या वर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या मुलाचा शोध घेत होते. अखेर आज वाकडजवळील पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले आहे.
- पुणे पोलिसांचे यश -
चतुश्रृंगी पोलिसात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्वर्णमचे एका ऍक्टिवा सारख्या दिसणाऱ्या गाडीतून अपहरण केलं असल्याचं सीसीटीव्ही तपासातून समोर आलं होतं. हा प्रकार बालेवाडी पोलीस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर सकाळी घडला होता. अखेर या चिमुरड्याला सुखरूप घरी पोहचवण्यात पोलिसांना यश आलं असून या प्रकरणात पोलीस इतर बाबींवर अजूनही लक्ष ठेवून आहेत.