पिंपरी-चिंचवड - पिंपरी चिंचवडमधील कोरोना योद्ध्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. महापालिकेने पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना अचानकपणे काढून टाकले आहे. ऑटो क्लस्टर जंबो रुग्णालयामधील डॉक्टर आणि डॉक्टर व्यतिरिक्त स्टाफचा यात समावेश आहे.
कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले -
कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येऊ लागल्याने महापालिकेने रुग्णालय बंद केले आहे. त्यामुळे स्टाफ अचानकपणे कमी करण्यात आला. या सर्वांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सेवा अधिग्रहित मधून या सर्वांना मुक्त करण्यात आले आहे. भविष्यात हे रुग्णालय सुरू करायची वेळ आली तर तेव्हा भरती प्रक्रिया राबवली जाईल, यात ते अर्ज करू शकतात, असे स्पष्टीकरण पालिकेने दिलेले आहे.
सेंटर तात्पुरते बंद -
गेल्या काही महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील बाधित रुग्णांची आकडेवारी वाढत होती. तेव्हा, ऑटो क्लस्टर जम्बो कोविड सेंटरमध्ये शेकडो रुग्णांवर उपचार केले जात होते. मात्र, सध्या बाधितांची संख्या आटोक्यात येताच हे सेंटर तात्पुरते बंद केले आहे. दरम्यान, कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची भाकीत यागोदरच करण्यात आले असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कोविड सेंटर बंद करण्याची घाई तर केली नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.