पुणे - कोरोना काळात ससून रुग्णालयातील डॉक्टर जिवाची बाजी लावून काम करत आहेत. त्यांच्या सोबतच बी. जे. मेडिकलमधील आंतरवासीय डॉक्टरदेखील प्रचंड मेहनत घेत आहे. मात्र, या आंतरवासीय डॉक्टरांना मिळणारे विद्या वेतन खूप कमी असल्याची तक्रार या डॉक्टरांकडून केली जात आहे. सध्यस्थितीत या डॉक्टरांना ११ हजार रुपये विद्यावेतन दिले जात असून ते खूप कमी आहे. मुंबईत कोरोनाची स्थिती उद्भवल्यानंतर तिथल्या चार मेडिकल कॉलेजमधील आंतरवासीय डॉक्टरांचे विद्यावेतन ११ हजारावरून ५० हजारांवर करण्यात आले आहे.
आंतरवासीय डॉक्टर सोहेल इनामदार यांनी सांगितले, की पुण्यात आम्ही महापालिकेच्या कोविड केअर युनिट, ससून आयसीयू तसेच ससूनच्या लॅबमध्ये काम करत आहोत. राज्यातील इतर भागात कोरोना काळात त्या त्या भागातील मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर काम करत आहेत. मात्र, मुंबई वगळता राज्यातील सर्व आंतरवासीय डॉक्टरांना केवळ अकरा हजारांवर काम करावे लागत असल्याची तक्रार या डॉक्टरांनी केली आहे. मुंबईप्रमाणे ससूनसह राज्यातील विविध भागात काम करणाऱ्या १९०० डॉक्टरांना ५० हजार स्टायपेंड मिळावा, अशी मागणी ते करत आहेत. या मागणीसाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डॉक्टरांच्या संघटनेने निवेदन दिले आहे. या मागणीसाठी कोरोनाच्या संकट काळात कुठलेही आंदोलन करणार नाही, आम्ही आमचे काम करतच राहू, असेदेखील या आंतरवासीय डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.