पुणे - पुण्यात काही व्यापारी आक्रमक झाले असून त्यांनी चार नंतरही दुकाने सुरूच ठेवली. आम्ही दुकाने सुरू ठेवू, तुम्ही कारवाई करा, अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली आहे.
हेही वाचा - कामिका एकादशीनिमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात फुलांची सजावट
काल आंदोलन करून आम्ही सरकारला इशारा दिला होता, मात्र सरकारकडून पुण्याला एक न्याय, मुंबईला एक न्याय देत आमच्या मागण्या मान्य न झाल्याने आम्ही दुकाने सुरूच ठेवत आहोत. पोलीस प्रशासन किंवा महापालिका जे काही कारवाई करेल किंवा दंड आकारेल, ते दंड आम्ही भरू, पण दुकाने 4 वाजता बंद ठेवणार नाही, असा पवित्रा पुण्यातील व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
काही ठिकाणी दुकाने सुरू तर काही ठिकाणी बंद
पुणे शहरात दुकाने 4 नंतर बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले असताना आज शहरातील व्यापाऱ्यांनी 4 नंतर दुकांने सुरूच ठेवणार, असा पवित्रा घेतल्यानंतर आज शहरात 4 नंतर काही ठिकाणी दुकाने सुरू होती. पोलिसांनी काही ठिकाणी दुकाने बंद केली, तर काहींवर कारवाई देखील केली. राज्य सरकारला आम्ही वारंवार मागणी करूनही व्यापाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. आम्हला वेळ वाढवून दिली जात नाही आहे. जो पर्यंत दुकाने वाढवण्याची वेळ वाढवून दिली जात नाही, तो पर्यंत आम्ही अशाच पद्धतीने दुकाने सुरू ठेवू, असे पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांच्यावतीने काल करण्यात आले होते आंदोलन
कोरोना काळातील निर्बंध शिथिल करत अनलॉकबाबतची नियमावली राज्यसरकारने जारी केली आहे. नवीन नियमावलीमध्ये राज्यभरातील जवळपास पंचवीस जिल्ह्यांना दिलासा मिळला आहे. मात्र, पुणे-सातारा जिल्ह्यांमध्ये आहे तेच निर्बंध लागू असणार आहे. या जिल्ह्यांत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहे. मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्हिटी दर आणि दैनंदिन वाढती लोकसंख्या पाहता या जिल्ह्यांतील आहे तेच निर्बंध कायम असणार आहे. यावर पुण्यातील व्यापारी आक्रमक झाले असून, पुणे व्यापारी महासंघाच्यावतीने काल शहरात 28 ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले होते.
हेही वाचा - राज्य सरकारला दणका, पुणे मनपामध्ये समाविष्ट 23 गावांचा विकास रखडणार, नियोजन समितीला हायकोर्टाची स्थगिती