पुणे - शहरात सोमवारी रात्री एकाच वेळी दोन ठिकाणी दोन तरुणाच्या खूनाचा प्रकार उघडकीस आला आहे. हडपसर येथील सोलापूर रोडवरील चौकात एका रिक्षाचालकाच्या गळ्यावर वार करुन त्याचा खून करण्यात आला आहे. तर सिंहगड रस्त्यावरील नवश्या मारुती चौकात मंदार जोगदंड (वय 23) या तरुणाचा खून झाला आहे.
हडपसर येथे प्रदीप शिवाजी गवळी (वय २५) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. चौकात प्रदीप गवळी याचा मृतदेह पडला असल्याची माहिती नागरिकांनी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. त्यानंतर हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू अडागळे यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. प्रदीप गवळी याच्या गळ्यावर वार करुन त्याचा खून करण्यात आल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. प्रदीप गवळी हे रिक्षाचालक असून खूनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गवळी यांचा कोणाशी वाद होता का, ही घटना घडताना कोणी पाहिले का याची पोलीस चौकशी करीत आहेत.
तर सिंहगड रस्त्यावरील नवश्या मारुती चौकात मंदार जोगदंड (वय 23) या तरुणाचा खून झाला आहे. मंदार जोगदंड खुन प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. मंदार हा स्मशानभूमीत काम करतो. त्याच्यावर अवैध दारु विक्री बाबत दोन आणि मारहाण केल्याचा एक असे तीन गुन्हे दाखल आहेत. पूर्वी तो एका दारु अड्ड्यावर काम करत होता. याठिकाणी असलेल्या काही तरुणांसोबत त्याची ओळख झाली होती. रात्री दारू पिल्यानंतर त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर चार जणांनी मिळून भर रस्त्यात मंदार जोगदंड याचा खून केला. दत्तवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना ताब्यात घेतले तर एक जण फरार आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.