पुणे - नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एमआयएम पक्षाच्या तिकीट वाटपात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप पुण्याचे माजी कोअर कमिटी सदस्य अंजुम इनामदार यांनी केला आहे. या गैरव्यवहारात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचा हात असल्याचे त्यांनी सांगितले.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी कराड दक्षिण मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी अल्ताफ शिकलगार यांच्याकडून ३० लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप इनामदार यांनी केला आहे. पुण्यातील कोहिनूर हॉटेलमध्ये हा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला.
ज्यांना पैसे मागण्यात आले आहेत. ते स्वतः या प्रकरणावर बोलण्यास तयार नसल्याचे इनामदार यांनी सांगितले. तसेच संबंधित प्रकरणात कराडचे एक पोलीस अधिकारी सहभागी असल्याचे ते म्हणाले. या प्रकराबाबत इनामदार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. पैसे कुठे, कधी, कसे घेण्यात आले; तसेच यासंदर्भातील दूरध्वनी संभाषणंही त्यांनी परिषदेत ऐकवली आहेत.
पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रार केल्याचे इनामदार यांनी सांगितले. तसेच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनाही याबाबत माहिती दिल्याचे त्यांनी म्हटले.