पुणे - सासरी येत नसल्याच्या कारणावरून पतीने भर रस्त्यात चाकूने वार करून पत्नीचा निर्घृणपणे खून केला. पुण्याच्या हडपसर परिसरातील भेकराईनगरमध्ये भरदिवसा हा प्रकार घडला. शुभांगी सागर लोखंडे (वय 21) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सागर बाळू लोखंडे (वय 23) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी देवाची गावात सागर आणि शुभांगी राहत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. सागर हा व्यसनांच्या आहारी गेला होता. तो सतत दारू आणि गांजा पीत असे. त्याच्या या स्वभावाला कंटाळून शुभांगी वारंवार माहेरी जात होती. आजही शुभांगी भांडणाला कंटाळून माहेरी आली होती. त्यानंतर ती आज सकाळच्या सुमारास कामावर जात असताना सागरने तिला रस्त्यात गाठले आणि घरी येण्यास सांगितले. त्यावर शुभांगीने नकार दिला.
यावरून भररस्त्यात दोघांचे भांडण सुरू झाले. त्यानंतर सागरने रागाच्या भरात शुभांगीच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने शुभांगी रक्ताच्या थारोळ्यात भर रस्त्यात पडली होती. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शुभांगीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.