पुणे - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये आणि प्रसार रोखता यावा, यासाठी पुणे शहरात आजपासून तीन दिवसासाठी हॉटेल आणि बार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे पोलीस आणि हॉटेल व्यवसायिकांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा... कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील ग्रामपंचायत, नगर पालिका निवडणूक प्रक्रिया स्थगित
कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून शहरात जणू काही अघोषित संचारबंदी असल्याचे वातावरण आहे. याला खासगी संस्थांनीही पाठिंबा दिला आहे. सोमवारी व्यापारी महासंघाने अत्यावश्यक सेवा वगळता आपली दुकाने पुढील तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता हॉटेल असोसिएशनच्या वतीनेही पुढील तीन दिवसांसाठी हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी आणि पुणे पोलिसात आज (मंगळवारी) दुपारी एक बैठक झाली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिली.