पुणे - कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी सध्यातरी कुठल्याही प्रकारचे औषध उपलब्ध नसल्याचे सांगत लक्षणानुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह एकूण रुग्णांपैकी तीन रुग्णांवर एचआयव्ही प्रतिबंधक औषधांचा वापर करण्यात आल्याची माहिती राज्याच्या आरोग्य संचालिका अर्चना पाटील यांनी दिली आहे.
पुण्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी अर्चना पाटील उपस्थित होत्या. राजस्थानमध्ये कोरोना बाधित रुग्णावर एचआयव्ही प्रतिबंधक औषधांमार्फत उपचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही अशाप्रकारे एचआयव्ही प्रतिबंधक औषधे वापरणार का? यावर बोलताना अर्चना पाटील यांनी ही माहिती दिली आहे.
दरम्यान, राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 45 झाली आहे.