पुणे - संपूर्ण जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळाचे परिणाम दिसत आहेत. शहरात पाऊस सुरू असून जोरदार वारे वाहत आहेत. शहरासोबतच नजीकच्या तालुक्यांमध्ये देखील सोसाट्याच्या वाऱ्यांना सुरुवात झालीय. भोर, मुळशी, वेल्हे या तालुक्यांमध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे.
चक्रीवादळ आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर या ग्रामीण भागात प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी 3 व 4 जून रोजी घरातच सुरक्षित रहावे, घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले होते. वेल्हे तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन वेल्हे आणि मुळशी भागातील परिस्थिती वर लक्ष ठेवून आहे. भोरमध्ये देखील बैठक घेण्यात आलीय.
तालुक्यात कच्ची किंवा पत्र्याची घरे, पत्र्याचे शेड अशा ठिकाणी असलेल्या लोकांची सोय तात्पुरती सोय मंदिरांमध्ये करण्यात आली आहे. याचसोबत शालेय इमारतीचा देखील निवाऱ्यासाठी वापर होत आहे. अनेक ठिकाणी झाडे, विजेच्या तारा कोसळण्याची शक्यता असल्याने या ठिकाणी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी आपआपल्या गावात थांबून त्या ठिकाणच्या परिस्थिती वर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वेल्हे तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास सुरू असून वादळी वारे आणि अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे, अशी सूचना प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी दिल्या आहेत.
चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असल्याने तहसील कार्यालयात २४ तास कार्यरत असणारा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सुरू केला आहे. प्रशासनाने उपाययोजना म्हणून धोकादायक गावे, इमारती, डोंगर व रस्ते यांची यादी तयार केली आहे. संबंधित यंत्रणेला आणि व्यक्तींना याबाबत नोटीस देऊन सूचित करण्यात आले आहे. तसेच, अत्यावश्यक वेळी गजर उद्भवल्यास जेसीबीची तयारी करण्यात आली आहे. यासाठी तालुक्यातील जेसीबीचालकांची यादी तयार ठेवण्यात आलीय. तालुक्यातील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना मुख्यालयात राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.