पुणे - येत्या 48 तासात महाराष्ट्रात दमदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच महाराष्ट्राच्या काही भागांना अतिवृष्टीचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे येत्या 48 तासात राज्यभरात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली तसेच वर्धा या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली भागातील घाट माथ्यावर येत्या 48 तासात जोरदार पाऊस होईल. तसेच नाशिकमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले. मराठवाड्यातही पावसाची शक्यता असून, हिंगोली व नांदेडमध्ये 13 ऑगस्टला काही ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
कोकण, गोवा भागांना पुढचे पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असून, पालघर ठाणे मुंबई या भागात 14 ऑगस्टला दमदार पाऊस होणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.