पुणे - राज्यातील महाविद्यालयातील प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवण्यात यावी या मागणीसाठी 19 जुलैपासून महाराष्ट्र प्राध्यापक संघटनेच्या वतीने पुण्यातील शिक्षण सहसंचालक कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे. परंतु, राज्य सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आंदोलनाच्या 28 व्या दिवशीही प्राध्यापक संघटनेच्या आंदोलनकर्त्यांनी अर्धनग्न होत आंदोलन केले आहे.
'राज्यभरातील पात्रताधारकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे'
मागील आठ दिवसांपासून आम्ही प्राध्यापकांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहोत. परंतु, अजूनही राज्य शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यातील पात्रताधारकांनी या ठिकाणी एकत्र येण्याचा संकल्प केला आहे. अनेक पात्रताधारक या ठिकाणी एकत्र जमा झाले आहेत. जास्तीत जास्त पात्रताधारक जर या आंदोलनात सहभागी झाले, तर प्राध्यापक भरतीचा प्रश्न लवकर सुटू शकतो. त्यामुळे राज्यभरातील पात्रताधारकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी आंदोलक प्राध्यापकांनी केले आहे.
'आजही अनेक उच्चशिक्षितांना आपले हक्क मिळवताना संघर्ष करावा लागत आहे'
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली असतानाही अनेक उच्चशिक्षितांना आपले हक्क मिळवताना संघर्ष करावा लागत आहे. पात्रताधारकांच्या मागण्या मान्य न करून या सरकारने आमच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आणली आहे. त्यामुळे आम्हाला अर्धनग्न आंदोलन करण्याची वेळ आली असल्याची खंत यावेळी या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
काय आहेत प्राध्यापकांच्या मागण्या?
राज्यातील कृषी विद्यापीठ आणि अनुदानित महाविद्यालयात लावण्यात आलेली प्राध्यापक बंदी उठवावी, शंभर टक्के पदभरती करावी, प्राध्यापकांचे थकीत मानधन द्यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.