पुणे - सिंहगडावर पर्यटनाला बंदी असल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांचे ढाबे पूर्णपणे बंद आहेत. सिंहगडावरील स्थानिक व्यावसायिकांच्या अडचणींकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे. मात्र, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून नुकतेच एमटीडीसीच्या नवीन लोगोचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्वात जवळचा गड म्हणजे सिंहगड म्हणून ओळखला जातो. अनेक गडप्रेमी पर्यटक नेहमी गडावर पर्यटनासाठी येतात. परंतु गेले दीड वर्ष कोरोनामुळे पर्यटनाला पूर्णपणे बंदी आहे. त्यामुळे येथील स्थानिक व्यावसायिकांच्या अडचणींमध्ये भरच पडत आहे. येथील स्थानिक व्यावसायिक पिढ्यानपिढ्या येथे झुणका भाकर केंद्राच्या मार्फत आपली उपजीविका चालवत आहेत. परंतु गेले दीड वर्ष पर्यटन बंद असल्याने स्थानिकांना आपली उपजीविका कशी चालवायची हाच मोठा प्रश्न पडला आहे.
हे आहेत गंभीर प्रश्न
लहान मुलांच्या आरोग्याचा, शाळेचा प्रश्न, तसेच इंधन दर वाढीमुळे दळणवळणाचा प्रश्नही त्यांना भेडसावत आहे. या बाबत येथील काही स्थानिकांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतने केला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून नुकतेच एमटीडीसीच्या नवीन लोगोचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. असे असले तरीही सिंहगडावरील स्थानिकांच्या अडचणींकडे मात्र त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील काही दिवसांपूर्वी सिंहगडाला भेट दिली. कोरोनाचे नियम लक्षात घेऊन दोनदा लसीकरण झालेल्यांना पर्यटन सुरू करण्यात यावे. आणि झुणका भाकरी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी येथील स्थानिकांची मागणी आहे.
हेही वाचा - कुपोषणामुळे एकाही बालकाचा मृत्यू झाला तर कठोर कारवाई करू; हायकोर्टाचा राज्य सरकारला इशारा