पुणे - कुख्यात गुन्हेगार नीलेश घायवळ याला पुणे पोलिसांनी येरवडा कारागृहातून अटक केली असून संपूर्ण घायवळ टोळीवरच मोक्कानुसार (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) कारवाई केली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी घायवळ याला एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्याला एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले होते. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी येरवडा कारागृहातून त्याला अटक केली.
फरार असलेल्यांचा शोध
मोक्काच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्यांची नावे नीलेश बन्सीलाल घायवळ (वय 44), संतोष आनंद धुमाळ (वय 38) व मुसाब उर्फ मुसा इलाही शेख (वय 29) अशी आहेत. याशिवाय घायवळ टोळीतील अक्षय गोगावले, विपुल माझिरे, कुणाल, कंधारे आणि इतर तिघांवर कारवाई केली आहे. त्यात ते फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.
चॉपरचा धाक दाखवून पळवली होती चारचाकी
याप्रकरणी अधिक माहिती अशी, की काही महिन्यांपूर्वी कोथरूड परिसरातील भुसारी कॉलनीतून एक चारचाकी गाडी आरोपी संतोष धुमाळ याने चॉपरचा धाक दाखवून नेली होती. भाऊच्या रॅलीसाठी ही गाडी पाहिजे, असे सांगून आरोपीने जबरदस्तीने ही गाडी नेली होती. यातील फिर्यादीने खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दिली होती. याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी घायवळ टोळीचा प्रमुख संतोष धुमाळ आणि मुसा याला अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत या गुन्ह्यात नीलेश घायवळ याचाही सहभाग आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात मोक्काची कारवाई करत त्याला अटक केली. त्याची रवानगी आता तीन वर्षासाठी येरवडा कारागृहात करण्यात येणार आहे.