पुणे - कट्टयांचे शहर पुणे, अशी पुणे शहराची ओळख सर्वदूर आहे. विविध सामाजिक विषयांवर होणारी चर्चा, खेळीमेळीच्या वातावरणात निघणारे निष्कर्ष आणि विचारांची देवाणघेवाण ही या कट्टयांची ओळख. मात्र, केवळ चर्चा आणि विरंगुळ्यापुरते हे कट्टे मर्यादित नाहीत. पुण्यातील टिळक रस्त्यावरील गिरीजा हॉटेल येथे भरणाऱ्या 'गिरीजा कट्टा' यांच्याकडून पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये असलेल्या 1 हजार आश्रित, गरजूंना दररोज दोन वेळचे भोजन दिले जात आहे.
हेही वाचा... ईटीव्ही भारत विशेष : राज्यातील आंबा आणि मच्छिमारी व्यवसाय संकटात
गिरीजा ग्रुप कट्ट्यातर्फे पुणे महापालिके अंतर्गत असलेल्या ९ शाळांमधील सुमारे १ हजार आश्रितांना दररोज दोन वेळचे भोजन दिले जात आहे. महापालिकेचे कर्मचारी गिरीजा हॉटेल येथून हे भोजन दररोज दुपारी व सायंकाळी घेऊन जातात. त्यानंतर संबंधित शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून त्याचे वितरण करत आहेत.
गिरीजाचे दादा सणस, सुरेश सणस, निनाद पुणेचे उदय जोशी, रामलिंग शिवणगे, मावळ-मुळशीचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के, धनजंय जाधव, मयूर पन्हाळे, अॅड.वैजनाथ विंचूरकर, श्रीकृष्ण पाटील, किशोर खैराटकर, नवाझ फैजखान, सुभाष दगडे, नरेश माळवे, राहुल पवार, राहुल कुलकर्णी यांसह विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरु आहे. गिरीजा हॉटेलचे कर्मचारी दुपारी खिचडी भात आणि रात्री पोळी-भाजी असे भोजन यासाठी तयार करतात.
हेही वाचा... बारामतीत कोरोनाचा पहिला बळी
या उपक्रमाबाबत बोलताना गिरीजाचे दादा सणस यांनी सांगितले की, 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर गिरीजा हॉटेलसमोर एक भिक्षेकरी रस्त्यावरील कचऱ्याच्या पिशव्यांमधील खरकटे अन्न खाताना आम्हाला दिसला. ते विदारक चित्र पाहून या लॉकडाऊनच्या काळात अशा गरजूंसाठी काहीतरी करावे, असे आम्ही ठरवले. त्यानुसार दररोज दुपारी आणि रात्रीचे भोजन महापालिकेच्या शाळांमध्ये ठेवण्यात आलेल्या गरजूंना आम्ही पाठवत आहोत' तसेच, 'लॉकडाऊननंतर दिनांक २७ मार्चपासून या उपक्रमाला सुरु झाली. कोथरुड, बावधन, हडपसर, धनकवडी, कात्रज, विश्रामबाग, कोंढवा, वानवडी, बिबवेवाडी, भवानी पेठ, घोले रस्ता भागांतील शाळांमध्ये हे भोजन दिले जात असल्याचे उदय जोशी यांनी सांगितले.