पुणे - महामारीच्या उद्रेकाने यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय शहरातील गणपती मंडळांनी घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेशोत्सव मंडळांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती. यामध्ये शहरातील मानाची गणपती मंडळे तसेच अन्य मंडळांची उपस्थिती होती. ऑनलाइन बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
या बैठकीत कसबा गणपतीचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, सौरभ धोकटे, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर उपस्थित होते. तसेच भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे अध्यक्ष संजीव जावळे, उत्सव प्रमुख पुनीत बालन याचीही उपस्थिती होती.
यंदा महामारीचा सामना करण्यासाठी सार्वजानिक गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने न साजरा करता साध्या पद्धतीने साजरा करण्यावर सर्वांचे एकमत झाले.
यावर्षी गणेशोत्सवात पूजा-अर्चा, गणेश याग, मंत्रजागर, अथर्वशीर्ष, आरती धार्मिक विधी पार पाडून सण साजरा करण्यात येणार असल्याचे मंडळांनी सांगितले. याचसोबत नागरिक तसेच गणेशभक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊन गणेशोत्सव पार पाडण्यावर शिक्कामोर्तब केले. नित्य धार्मिक कार्यक्रमांव्यतिरीक्त होणारे इतर सर्व सार्वजानिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.
गणेशोत्सवाचे नियोजन तसेच मिरवणुकीच्या निर्णयाबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार आणि व्यापक समाजहित लक्षात ठेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. शासनाला संपूर्ण सहकार्य करून, सर्व नियमांचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल.
गणेशोत्सवाच्या स्वरूपासंदर्भात पुण्यातील सर्व गणेश मंडळाना विश्वासात घेऊन बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत सर्व मंडळांनी नागरिकांना, मूर्तीकारांना आणि इतर सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांना आगामी गणेशोत्सवात कोणीही गणरायाला मास्क न लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे पावित्र्य भंग होण्याचा धोका असल्याचे उपस्थितांनी सांगितले.