पुणे - युवराज ढमाले याने माझ्यावर गुन्हा दाखल केल्यासंदर्भात अद्यापपर्यंत पोलिसांकडून कळवलेले नाही. ढमालेने माझ्यावर केलेल्या आरोपांबाबत मला बोलवून अथवा माझे जबाब न घेता आणि कोणतीही शहानिशा न करता एकतर्फी गुन्हा दाखल केला आहे. हे राजकीय षडयंत्र आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव होता? यासह या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी माजी खासदार संजय काकडे यांनी केली आहे.
तसेच जनतेसमोर सर्व सत्य यावे म्हणून शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, पुणे शहर पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांना निवेदन देणार आहे. तसेच, या आरोपांमुळे मानहानी झाली असून, संबंधितांवर मानहानी झाल्याचा व 100 कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे संजय काकडे यांनी सांगितले.
पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यापूर्वी ढमाले याने माझ्यावर केलेल्या आरोपांची मला बोलवून शहानिशा करायला हवी होती. माझा प्रत्यक्ष जबाब नोंदवून घेऊन कायदेशीरपणे गुन्हा नोंदवायला हवा होता. कारण, ढमालेनी तीन वर्षांपूर्वी मी त्याला दम दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. इतक्या वर्षांपूर्वी झालेल्या घटनेबाबत एखादी व्यक्ती तक्रार देत असेल तर, पोलिसांनी त्याविषयी खात्री करून पुढील कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु, तसे घडले नाही. चतुश्रुंगी पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हा नोंदवण्यापूर्वी आरोपांची साधी खात्रीदेखील करावीशी वाटली नाही. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मला पत्रकारांकडून समजली. महाराष्ट्रातील पोलिसांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. परंतु, चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमधील पोलिसांना गुन्हा दाखल करून घेण्यासाठी कुणाचे फोन आले? कोणी त्यांच्यावर दबाव आणला? याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी एखादा विशेष तपास अधिकारी नियुक्त करून चौकशी करावी, अशी मागणी सजय काकडे यांनी केली आहे.
दरम्यान, ढमालेने तक्रार दाखल केल्याच्या दोन दिवस अगोदर व पोलीस स्टेशनच्या संबंधीत अधिकाऱ्याचे दोन तास अगोदर व नंतरचे फोन कॉल रेकॉर्ड तपासले जावेत, असेही खासदार संजय काकडे यांनी सांगितले. वास्तविक 29 ऑगस्ट 2017 आणि 29 ऑगस्ट 2018 या माझ्या वाढदिवसाच्या दिवशी युवराज ढमाले पुष्पगुच्छ घेऊन आला असतानाच भेट झालेली आहे. या व्यतिरिक्त आजपर्यंत गेल्या तीन वर्षात त्याच्याबरोबर माझं बोलणंदेखील झालेले नाही. माझी पत्नीदेखील त्याच्याबरोबर एक वर्षांपासून बोलत नाही. दहा वर्षांपूर्वी सोपान बागेतील एका प्रकल्पामध्ये युवराज ढमाले भागीदार होते. परंतु, त्यानंतर गेल्या दहा वर्षांत आमचा कोणताही व्यवसाय ढमालेबरोबर भागिदारीमध्ये नाही. त्यामुळे ढमाले याने माझ्यावर केलेले आरोप निराधार आहेत. यामागे राजकीय षडयंत्र आहे. कोणीतरी ढमालेला पुढे करून अशाप्रकारे गुन्हा दाखल करण्याचे काम केले असावे. या गुन्ह्यासंदर्भात मी कायदेशीर सल्ला घेऊन संबंधितांवर 100 कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असेही माजी खासदार संजय काकडे म्हणाले.