पुणे - मुळा आणि मुठा नदीच्या शुद्धीकरण प्रकल्पामधील बाणेर येथील जलवाहिन्यांचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. त्याप्रमाणेच नदी शुद्धीकरणाच्या ४ अन्य प्रकल्पांना ऑगस्टपर्यंत मंजुरी मिळेल, अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.
मुळा आणि मुठा नद्यांच्या शुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात आज पुण्यातील वन भवन येथे प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, आदी उपस्थित होते.बैठकीमध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जावडेकर यांना प्रकल्पाला झालेल्या विलंबा संदर्भात माहिती दिली.
बैठकीनंतर प्रकाश जावडेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले, की मुळा आणि मुठा नदी सुधार प्रकल्प पुणे महानगरपालिका आणि केंद्र सरकारचा संयुक्त प्रकल्प आहे. यामध्ये जयकाने केवळ निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रदूषण संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना जावडेकर म्हणाले, की देशातील ३ हजारपेक्षा जास्त कंपन्यामध्ये दूषित पाण्याच्या निरीक्षणासाठी मीटर बसवण्यात आले आहेत. त्याच्यावर थेट पर्यावरण मंत्रालयातून निगराणी ठेवण्यात येत आहे.
त्याप्रमाणेच बांधकामच्या राडारोड्याची विल्हेवाट योग्यरित्या लावावी यासाठी आम्ही नोटिफिकेशन काढले आहे. त्यामुळे बांधकामाचा राडारोडा नदीत टाकला, तर तो गुन्हा ठरेल. तसेच यासंदर्भात लोक थेट तक्रार किंवा जनहित याचिकेद्वारे हे प्रदूषण थांबवू शकतील, असे ही प्रकाश जावडेकर म्हणले.