पुणे - लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर येत्या 16 सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत करणार प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपास्थितीत हा प्रवेश होणार आहे. मुंबईतील राष्ट्रवादी भवनामध्ये हा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे.
अनेक महिन्यांपासून रंगल्या होत्या चर्चा
सुरेखा पुणेकर राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होती. जुलै महिन्यात त्यांनी स्वतः विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाच्या रिक्त जागेवर निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती.
काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे काही महिन्यांपूर्वी दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे देगलूर बिलोली मतदारसंघाची ती जागा आता रिक्त झाली आहे. रिक्त जागेवर निवडणूक लढविण्यासाठी अनेक इच्छुकांनी गर्दी केली. आता त्या विधानसभेसाठी येणाऱ्या काही दिवसात पोटनिवडणूक देखील होणार आहेत. त्यावर सुरेखा पुणेकर यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने बरीच चर्चा रंगली होती. याआधी पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आमदार होण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली होती. मात्र त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांनी स्वतः बोलून दाखवले होतं. मात्र आता अखेर सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत.