पुणे - शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली असून आज आणखी पाच पॉझिटिव्ह सापडले आहेत. आता विभागातील एकूण संख्या 77 झाली आहे. यामध्ये पुणे शहर 36, पिंपरी चिंचवड 12, सातारा 2, सांगली 25 आणि कोल्हापूरात दोन रुग्ण आहेत. तसेच तपासणीसाठी 1633 नमूने दाखल करण्यात आले असू यामधील 1529 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यातील 104 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहे.
प्राप्त अहवालापैकी 1413 निगेटिव्ह, तर 77 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 16 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. पुणे विभागात अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा साठा याबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार शासकीय धान्य गोदामात 19 हजार 975 मेट्रिक टन धान्यसाठा उपलब्ध आहे.
मार्केट विभागात एकूण 22 हजार 913 क्विंटल अन्नधान्याची अंदाजे आवक असून भाजीपाल्याची आवक 9486 क्विंटल, तर फळांची 16 हजार 807 क्विंटल आवक झाली आहे. तसेच कांदे आणि बटाट्याची 42,971 आवक झाली आहे.
विभागामध्ये जिल्हा प्रशासनमार्फत 89 व साखर कारखान्यामार्फत 26 असे एकूण 115 रिलीफ कॅम्प स्थलांतरित मजूरांसाठी उभारण्यात आले आहेत. यामध्ये एकूण 8,199 स्थलांतरित मजूर असून एकूण 63 हजार 171 मजूरांना जेवण देण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.