पुणे - भारतीय सैन्यदलाची बनावट वेबसाइट तयार करून त्याआधारे सैन्यदलातील नियुक्तीचे बनावट प्रमाणपत्र देऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले असून, एकाला अटक करण्यात आली आहे.
भारत कृष्णा काटे (वय 41) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या आणखी काही साथीदारांच्या शोध सुरू आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. याप्रकरणी सलमान गौसउद्दीन शेख (वय 21, करडखेर गाव, लव्हारा, उदगीर, लातूर) या तरुणाने तक्रार दिली आहे.
हेही वाचा - शिक्षकांसाठी खुशखबरः आता आयुष्यभर राहिल TET सर्टिफिकेटची वैधता
- एका आरोपीला अटक -
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी भारत काटे याची भारतीय सैन्य दलात भरती पूर्व प्रशिक्षण संदर्भात अकॅडमी आहे. सैन्य दलात भरती होण्याच्या उद्देशाने त्याच्याकडे येणाऱ्या तरुणांना तो विश्वासात घेऊन सैन्य दलात नोकरी लावण्याचे आमिष दाखवत होता. या बदल्यात त्यांच्याकडे सहा ते सात लाख रुपयांची मागणी करत होता. यातील काही पैसे मिळाल्यानंतर तो त्यांना दिल्ली, झांसी, रांची, लखनऊ, जबलपूर या शहरात बनावट मेडिकल चाचणीसाठी पाठवायचा आणि त्यानंतर त्यांना बनावट नियुक्तीपत्र द्यायचा.
- 9 तरुणांनी दिली तक्रार
दरम्यान, सदर्न कमांडच्या इंटेलिजन्स अधिकाऱ्यांना भारतीय सैन्य दलाची बनावट वेबसाइट करून फसवणूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी पुणे पोलिसांना याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास केला असता, वरील सर्व प्रकार उघडकीस आला. आरोपी भारत काटे याने आतापर्यंत तक्रारदार आणि त्याच्या काही साथीदारांकडून 13 लाख 50 हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. आतापर्यंत 9 तरुणांनी अशा प्रकारे आपली फसवणूक झाल्याचे सांगत तक्रार दिली आहे.
हेही वाचा - केंद्र सरकार 'या' कंपनीकडून ३० कोटींची कोरोना लस करणार खरेदी