पुणे - पुण्यातील लाल महाल उन्हाळ्याच्या सुट्टीत पुणे महानगरपालिकेने बंद ठेवला असताना ही जिजाऊ-शिवरायांच्या लाल महालात रिल्स काढण्याच्या नादात चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर मुली नाचत आहेत. जिजाऊंच्या समोर असले नाचगाण्यांचे प्रकार हे लाल महालाची बदनामी करणारे आहेत. मानसी पाटील, कुलदीप बापट आणि केदार अवसरे यांनी हे गाणे त्या ठिकाणी लाल महालात शूट केला आहे. त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी संभाजी ब्रिगेडने मागणी केली ( Sambhaji Brigade demanded ) आहे.
गुन्हा दाखल करण्याची मागणी - हजारो पर्यटक जिजाऊ-शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात, मात्र पुणे महानगरपालिका आणि तिथल्या सुरक्षा रक्षकांकडून लाल महाल बंद ठेवण्यात आलेला आहे. मात्र दुसरीकडे अशा पद्धतीने लावणी सादर केले जात आहे. हे निंदनीय असून सबंधितांवर गुन्हा दाखल व्हावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.
'हा लाल महालाचा अवमान' - जिजाऊ-शिवरायांची अस्मिता म्हणजे तो लाल महाल आहे. हजारो शिवप्रेमी लाल महालात जाऊन नतमस्तक होत असतात. त्याच ठिकाणी लाल महाल बंद असताना चित्रपटाची घाणेरडी गाणी चित्रीत करून लाल महाल बदनाम केला जात आहे. या जिजाऊ-शिवरायांनी सोन्याचा नांगर चालून हे पुणे वसवले, त्याच जिजाऊंच्या लाल महालामध्ये अशा पद्धतीची गाणी चित्रित करणे हे निषेधार्ह आहे. हा लाल महालाचा अवमान आहे. या घाणेरड्या व्हिडिओ संदर्भात दोन-तीन दिवसापूर्वी पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आलेली आहे. मात्र पोलीस प्रशासन तक्रार दाखल करायला तयार नाही. मात्र आम्ही पाठपुरावा सोडणार नाही. या सर्व लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत. असे देखील यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी सांगितले आहे.
पोलिसांची प्रतिक्रिया - हे जे काही लाल महाल येथे लावणी सादर करण्यात आली आहे. ती लावणीचे एक महिन्यांपूर्वी शूट करण्यात आले आहे. या प्रकरणी संभाजी ब्रिग्रेडकडून अर्ज प्राप्त झाला आहे. याची माहिती घेऊन तसेच महापालिका प्रशासनाशी देखील माहिती घेऊन पुढील चौकशी केली जाणार आहे अशी माहिती फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी दिली आहे.
हेही वाचा - भारत पाकिस्तान फाळणीत वेगळे झालेल्या बहिण-भावांची 75 वर्षानंतर भेट15340035