पुणे - फॅमिली कोर्टात काम करणाऱ्या 50 ज्युनिअर वकिलांना मदतीचा हात देण्यासाठी द फॅमिली कोर्ट असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. असोसिएशनतर्फे दोन महिने पुरेल एवढे अन्नधान्य आणि किराणा देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष वैशाली चांदणे यांनी दिली. यापूर्वी त्यांनी लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वकिलांना दरमहा सात हजार रुपये मदत देण्याची मागणी राज्य सरकारकडे केलीय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर संपूर्ण देशातील न्यायालये सध्या बंद आहेत. यात पाच वर्षांपेक्षा कमी प्रॅक्टीस असलेल्या ज्युनिअर वकिलांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सुरुवातील त्यांना काम कमी असते. सिनिअर वकिलांकडून त्यांना मदत मिळत असते. मात्र, सध्या न्यायालये बंद असल्याने त्यांचे हाल होत आहे.
वकिलांची शिखर संघटना असलेल्या बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या वतीने वकिलांना तीन महिने स्टायपेंड देण्याची मागणी होत आहे. पुणे बार असोसिएशनकडूनही मदत करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कौटुंबिक न्यायालय प्रॅक्टीस करणाऱ्या ज्युनिअर वकिलांना द फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनकडून मदत देण्यात येणार आहे. कौटुंबिक न्यायालयातील सुमारे 50 जणांना ही मदत करण्यात येणार असून, त्यापैकी 25 जणांशी संपर्क झाला आहे. ते 6 एप्रिलला कौटुंबिक न्यायालयात येणार आहेत. याचवेळी त्यांना मदत देण्यात पुरवण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष अॅड. वैशाली चांदणे यांनी दिली.