आळंदी (पुणे) - संत ज्ञानेश्वर माऊलींचा आषाढी वारी सोहळा आज (शनिवार) सुरू होत आहे. सायंकाळी चार वाजता माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होत असताना इंद्रायणी घाट हा पहिल्यांदाच मोकळा मोकळा पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागातला शेतकरी, तरुणवर्ग या वारी सोहळ्यात सहभागी होऊ शकला नसला, तरिही 'माझ्या शेतकऱ्याला आषाढीवरीतून बळ मिळू दे' अशी भावना गायिका कार्तिकी गायकवाड हिने ईटीव्ही भारतसोबत बोलताना व्यक्त केली.
अलंकापुरीमध्ये आषाढीवारी सोहळा होत असताना ग्रामीण भागातील शेतकरी, तरुणवर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत असतो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे हा आषाढी वारीचा सोहळा मर्यादीत लोकांमध्ये साजरा करण्याची वेळ आल्याची खंत कार्तिकी गायकवाडने व्यक्त केली. या सोहळ्यात वारकरी आणि भाविकांना सहभागी होता आले नसले, तरिही प्रत्येक जण माऊलींच्या या सोहळ्यात घरात बसून मनाने सहभागी झाला आहे. त्यामुळे या वारकऱ्यांना, शेतकऱ्यांना आणि तरुण वर्गाला पुढील काळात जगण्यासाठी बळ मिळू दे, अशी प्रार्थना माऊली चरणी अभंगवाणीतून कार्तिकी गायकवाडने केली.
हेही वाचा... 'हरित वारी आपुल्याच द्वारी' आषाढी एकादशी निमित्त यावर्षी स्तुत्य उपक्रम
सोशल मीडियाच्या माध्यमातून आताची तरुण पिढी माऊलींच्या वारीमध्ये सहभागी होत आहे. यामध्ये या तरुण पिढीला वेगळा उत्साह आणि उमेद या वारीतून मिळत आहे. या सर्वांनी कोरोनाच्या महामारीतुन देवस्थान व प्रशासनाला सहकार्य करून कोरोनावर मात करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन कार्तिकी गायकवाड वारकऱ्यांना केले आहे