पुणे - पुणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2022 मध्ये होत आहेत. गेली अनेक वर्ष महापालिकेत आपली सत्ता होती. मात्र मोदी लाट आणि विरोधकांनी केलेल्या खोट्या आरोपांमुळे आपल्याला पराभव पत्करावा लागला, आता मागील चुका टाळून कामाला लागा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
सध्या राज्यात शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणे मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा घेतला होता. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात बोलतना अजित पवार यांनी महापालिका निवडणुकीबाबतही कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी व्यासपीठावर कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार आणि शहराध्यक्ष चेतन तुपे, खासदार वंदना चव्हाण, पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अरुण लाड, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सत्तेचा गैरवापर कसं करायचं हे भाजपकडून शिकावे - अजित पवार
पुणे महापालिकेवर अनेक वर्ष आपली सत्ता होती, सत्तेचा फायदा सर्वसामान्य जनतेसाठी करताना शहरात विकास कामे करण्यात आपल्याला यश आले. राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे त्यांनी प्रभाग रचनेमध्ये अनेक बदल केले. सत्तेचा गैरवापर आपण कधीच केला नाही. मात्र सध्या विरोधात असलेल्यांनी गेल्या पाच वर्षाच्या सत्ताकाळात काय प्रकार केले आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. सध्या महापालिकेत बहुमताच्या जोरावर काहीही करण्याचे प्रकार सुरू आहे. सत्तेचा गैरवापर कसा करायचा, हे भाजपकडून शिकावे अशी टीकाही यावेळी अजित पवार यांनी भाजपवर केली.
यंदा तरुण सहकाऱ्यांना उमेदवारी-
2022 मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यंदा तरुण सहकार्यांना उमेदवारी देऊ कारण काळानुरूप बदल करावेच लागतात. जोपर्यंत कार्यकर्ते या पदावर बसत नाहीत, तोवर संघटना मजबूत होत नाही. कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे, म्हणून यंदाच्या निवडणुकीत तरुण कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊ असेही यावेळी अजित पवार यांनी स्पष्ट केले.
आघाडीची चर्चा आम्ही करू, तुम्ही काहीही बोलू नका -
महापालिका निवडणुकीत आघाडी कोणाबरोबर करायची याची चर्चा आम्ही करु, सध्या कोणीही काहीही पोपटासारखी चर्चा करू नका. आम्ही आमचे काम करू, तुम्ही तुमचे काम चांगले करा, अशा आपल्या खास शैलीत अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना कान पिचक्या दिल्या. तसेच सर्वांनाच माहिती आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व निर्णय आदरणीय शरद पवार हे घेतात, तसेच कॉंग्रेस पक्षाचे निर्णय सोनिया गांधी आणि शिवसेनेचे निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत असतात. त्यामुळे कोणीही काही बोलले तरी त्याकडे दुर्लक्ष करा आणि पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडा, असे आवाहनही यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केले.
चंद्रकांत पाटील फार कर्तृत्ववान नाहीत, त्यांना किंमत देऊ नका-
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव मी एवढे भारी ठेवले होते, 'ते म्हणजे चंपा' सर्वांना हे आवडले आहे. मात्र त्यांना आवडले का नाही हे माहीत नाही. चंद्रकांत पाटील पवार साहेबांबद्दल बोलले म्हणजे सूर्यावर तुखण्यासारखे आहे. तीच थुंका पून्हा तुमच्यावर परत येईल, अशा शब्दात अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या पवारांवरील टीकेचा समाचार घेतला.
महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी सर्वांनीच मिळून काम करा
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून पदवीधरची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविली जात आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करावे, प्रत्येक 50 मतदारांच्या पाठीमागे एक कार्यकर्ता, असे नियोजन करून जास्तीत जास्त मतदान करून घ्या. नाहीतर मागच्या वेळी आपण पाहिले आहे की अधिकाऱ्यांनी नाईलाजासव चंपाला विजयी केले. म्हणून या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी जबाबदारीने काम करून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करायचे आहे, अस आवाहन करताना अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांवर पुन्हा एकदा निशाणा साधला.